गुणवत्ता चाचणीत ४८ औषधे ‘फेल’, मधुमेह, रक्तदाबाच्या औषधांचाही समावेश
पुढारी ऑनलाईन डेस्क : नियमित वापरातील ४८ औषधे गुणवत्ता चाचणीत निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनला ( सीडीसीसीओ ) आढळले आहे. यामध्ये नियमित वापरातील मधूमेह, रक्तदाबासह विविध आजारांसाठी वापरल्या जाणार्या औषधांचा समावेश आहे.
'सीडीएससीओ'च्या पाहणीनुसार, मार्चमध्ये देशातील अनेक उत्पादन युनिटमधून १४९७ औषधांचे नमुने घेण्यात आले होते, त्यांची चाचणी करण्यात आली. १४४९औषधे मानकांची पूर्तता करतात; परंतु ४८ औषधांची गुणवत्ता निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचे आढळले.
गुणवत्ता तपासणीत नापास झालेल्या औषधांमध्ये डायबेडिज, रक्तदाब ( बीपी), प्रतिजैविक, कॅल्शियम किंवा हृदयरोगाशी संबंधित औषधांचा समावेश आहे. मल्टी-व्हिटॅमिन औषधांपासून ते एचआयव्हीसाठी वापरल्या जाणार्या रिटोनावीर, तसेच गॅबापेंटिन, उच्च रक्तदाबासाठी वापरले जाणारे टेलमा, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड आणि मेटफॉर्मिन यांचाही या यादीत समावेश आहे. आयर्न आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, प्रोबायोटिक्स अशा अनेक मल्टीविटामिन गोळ्या, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 12, फॉलिक ॲसिड, अमोक्सीसिलिन, कॅल्शियम- आणि व्हिटॅमिन डी ३ आणि तेलमिसार्टन गोळ्याचाही या यादीत समावेश आहे. तसेच मेस्वाक टूथपेस्टचेही यादीत नाव आहे.
गुणवत्ता चाचणीत औषध फेल का?
संबंधित औषधांची चाचणी केली असता आढळले की, संबंधित औषधे बनवण्यासाठी वापरलेली सामग्री प्रमाणित पातळीवर नाही, त्यातील घटकांचे प्रमाण किंवा चुकीचे लेबलिंग या कारणांमुळेही संबंधित औषधे गुणवत्ता चाचणीत निर्धारित मानकांची पूर्तता करण्यात अपयशी ठरली आहे. नुकतेच केंद्र सरकारने निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या प्रकरणी 18 फार्मा कंपन्यांचे परवानेही रद्द केले होते.
हेही वाचा :

