गोव्यातला ‘हा’ पायलट तुम्हाला माहीत आहे का? आजही आहे दुर्लक्षित... - पुढारी

गोव्यातला ‘हा’ पायलट तुम्हाला माहीत आहे का? आजही आहे दुर्लक्षित...

पणजी : जयश्री देसाई

गोव्याच्या प्रवासी वाहतूक व्यवस्थेतील एक महत्वाचा घटक म्हणजे मोटारसायकल पायलट होय. जो केवळ गोव्यातच तुम्हाला पाहायला मिळेल. अडीअडचणीच्या प्रसंगी वेळेत आणि सुरक्षितपणे हव्या त्या ठिकाणी पोहचविणारा अत्यंत विश्वासू, भरवशाचा सारथी म्हणजे पायलट अशी यांची ओळख आहे. कुठलेही महत्वाचे काम असो, कुठलीही मिटिंग असो, एखाद्या ठिकाणाहून एखाद्या ठिकाणी पटकन जायचे असो ते नेहमीच तुमच्या सेवेसाठी तत्पर असतात. स्टॅण्डवर, शहरात वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवर, समुद्रकिनाऱ्यांवर तुम्हाला ते पाहायला मिळतात. ‘पात्राव पायलट झाई’ अशी हाक आली म्हणजे ते तुम्हाला तुमच्या ईप्सित स्थळी पोहोचविण्यासाठी तत्पर आहेत हे समजून जायचं.

अर्थातच गोव्याच्या पारंपरिक व्यवसायांपैकी असणारा एक महत्वाचा घटक म्हणजे मोटारसायकल टॅक्सी पायलट आहे. साधारण पोर्तुगीज काळापासून हा व्यवसाय गोव्यात अस्तित्वात आहे. पण १९८० साली या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळाली. तेव्हापासून आजपर्यंत गोव्यातील इतर पारंपारिक व्यावसायिकांप्रमाणेच आपल्या हक्कांसाठी हा वर्ग लढतो आहे. या वर्गाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी गोवा मोटारसायकल असोसिएशनने वेळोवेळी विविध प्रस्ताव देऊनही या वर्गाकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. कोविड महामारीच्या काळातही हा घटक तसा वंचितच राहिला आहे.

२२ मार्च २०२० रोजी केंद्र शासनाने सर्वाना घरी राहून काम करायला सांगितले. नोकरी असणारे घटक घरी बसून काम करू लागले. शाळा, महाविद्यालये बंद झाली, अत्यावश्यक सेवेसाठी वगळता कुणीही कुठे बाहेर पडेनासे झाले. “दो गज दुरी, मास्क हे जरुरी” असे म्हणत सरकारने जागृती सुरु केली. जेमतेम बचत असणाऱ्या या वर्गासमोर कामाचा पर्यायच बंद झाल्यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. कसाबसा १-२ महिने संसार चालविला मात्र पुढे काय? ही समस्या होतीच. उसनवार करून आणखी काही दिवस रेटले मात्र त्यानंतर पुन्हा तोच प्रश्न… स्वाभिमानी आणि कष्ट करून जगणाऱ्या या वर्गाकडे या काळात कधी नव्हे ते मदत मागण्याची वेळ आली. पहिल्या लॉकडाउनच्या काळात सीआयडी अधिकारी दत्तगुरु सावंत यांनी पुढाकार घेऊन वाळपई, होंडा, साखळी, डिचोली या भागातील मोटारसायकल चालकांना अन्नधान्य वाटप केले. असोसिएशनने व्हिडिओच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले असता रोटरी क्लब, काही लोकप्रतिनिधी आणि संस्थांनी गोव्यातील विविध भागातील या वर्गाला मदत देऊ केली. मात्र शासनाने अद्याप या वर्गाकडे पाहिलेले नाही.

माहिती आणि प्रसारण खात्याचे तत्कालीन संचालक सुधीर केरकर यांनी गोवा मुक्तीच्या ६०व्या वर्षानिमित्त गोव्यातील पारंपारिक व्यवसायिकांच्या मदतीसाठी म्हणून गोवा मोटारसायकल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्याकडे या चालकांच्या मदतीसाठीचा प्रस्ताव मागविला होता. त्यांनी तो प्रस्ताव दिल्यानंतर एक मदत अर्ज तयार करून तो गोव्यातील विविध भागातील चालकांपर्यंत व्हाट्सअप च्या माध्यमातून पोहचवून भरून घेण्यात आला. प्रत्यक्ष मदत देण्याची वेळ आली तेव्हा मात्र या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. आणि पुढे या मदत योजनेत सुधारणेच्या नावावर इतर ३४ वर्गांचा समावेश करण्यात आला. ज्यामुळे सगळ्याच वर्गाचा हा अर्ज भरताना प्रचंड गोंधळ उडाला परिणामी अद्याप काहीच मदत मिळाली नाही. नंतर सरकारी शिक्के असणारेच अर्ज ग्राह्य धरले जातील असे सांगत, नगरपालिका, पंचायत यांच्याकडे अर्ज पाठविण्यात आले, या गोंधळात अनेकांना अर्जच मिळाले नाहीत. गणेशचतुर्थीपूर्वी मदत वाटप करण्याचे आश्वासन आणि अजूनही सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत या वर्गाला मिळालेली नाही.

कोविडने नाही, मात्र काम केले नाही तरी उपासमारीने जीव जाईल म्हणून काही चालक रोज घरातून बाहेर पडत आणि काम मिळेल या आशेने दिवसभर प्रवाशांची वाट पाहत असत. मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पूर्वी चालक कामासाठी म्हणून शहरात येऊन खोली घेऊन राहत असत. पण आता शहरातील वाढती महागाई आणि इथे राहणे परवडेनासे झाले म्हणून पुन्हा चालक आपल्या गावाकडे वळले आहेत. कामाच्या आशेने ते आपल्या गावातून रोज शहरात येतात, दिवसभर थांबतात पूर्वी दिवसाला १०-१२ प्रवासी मिळत असत, हल्ली १-२ मुश्किलीने मिळतात. त्यात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. रोजच्या स्वतःच्या प्रवासालाच १ लिटर पेट्रोल पुरत नाही, कमाई तशी वजाच असते अशी अवस्था चालकांची झाली आहे. या काळात अनेक चालक हे केवळ भविष्याच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेनेच हृदयविकाराच्या झटक्याने वारले. तर काहीना उच्च रक्तदाबासारखे आजार झाले आहेत.

साधारण महिनाभरापासून पुन्हा व्यवसाय सुरु झाला आहे. बाहेरून येणारे देशी पर्यटक बहुतांशी आपली वाहने घेऊन येतात अन्यथा ‘रेंट अ बाईक’ सारख्या बाईक भाड्याने घेतात आणि फिरतात. गोव्यात अनेकजण बाईक खूप कमी किमतीत भाड्याने देतात. त्यामुळे पायलटच्या व्यवसायावर परिणाम होतो आहे. मागच्या १०-१५ दिवसात पुन्हा एकदा ठिकठिकाणी बैठका घेऊन सरकारकडून मदतीचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता चालकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. निवडणुका जवळ आल्यामुळे पुन्हा एकदा सरकार आश्वासने देत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वर्गाने आंदोलने, मोर्चे, निदर्शने असा कोणताच मार्ग कधी पत्करला नाही. २००९ साली एकदाच हातात गुलाबाचे फुल घेऊन मोटारसायकल चालकांसाठी मासिक अर्थसहाय्य मिळावे यासाठी मूकमोर्चा काढण्यात आला होता आणि एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. याची दखल घेत २०१० पासून सरकारने या वर्गासाठी मासिक अर्थसहाय्य हीं योजना सुरु केली. ही योजना २०१२ पर्यंत नियमित सुरु राहिली. त्यानंतर मध्ये मध्ये खंड पडत २०१७ पर्यंत काही प्रमाणात ती सुरु राहिली. त्यानंतर मात्र अद्याप या योजनेचे नूतनीकरण झालेले नाही. राज्य तसेच केंद्र सरकारकडून या वर्गासाठी कधीच कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध झाला नाही कि कोणती योजना मंजूर झाली नाही. – सुरेश ठाकूर (अध्यक्ष – गोवा मोटारसायकल टॅक्सी असोसिएशन)

गोवा मोटारसायकल टॅक्सी असोसिएशनकडून नेहमीच काही समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. वेळोवेळी रक्तदान शिबिरे घेतली जातात. कोविड काळात असोसिएशनने रुग्णालयातील रुग्णांना जेवण पुरविण्याचे काम केले आहे. तर ठिकठिकाणी स्वच्छता मोहीमही राबविली जाते. कठीण प्रसंगातही आपली सामाजिक जबाबदारी असोसिएशन जपत आहे.

या आहेत संघटनेच्या मागण्या

  • बंद पडलेली मासिक अर्थसहाय्य योजना योग्य ते नूतनीकरण करून पुन्हा सुरु करावी
  • वाहन दुरुस्तीसाठी पूर्वी ५०००रु अनुदान दिले जायचे ते बंद केले आहे, ते पुन्हा सुरु करावे
  • वाहन खराब झाल्यास नवीन वाहन खरेदीसाठी २५% अनुदान मिळावे
  • बँकांनी तसेच ईडीसी (इकॉनॉनिक डेव्हलपमेंट कार्पोरेशन) यांनी कर्जाची तरतूद करावी
  • मच्छिमारांना ज्याप्रमाणे डिझेलवर अनुदान दिले जाते, तशीच तरतूद पायलटसाठी पेट्रोलवर अनुदान देण्यासंदर्भात करावी

Back to top button