अंतराळातून आले रहस्यमय रेडिओ सिग्‍नल्स! - पुढारी

अंतराळातून आले रहस्यमय रेडिओ सिग्‍नल्स!

न्यूयॉर्क : अलीकडेच खगोल शास्त्रज्ञांनी अंतराळातून आलेल्या काही रेडिओ सिग्‍नल्सचा छडा लावला आहे. त्यामुळे पृथ्वीशिवाय अन्यत्रही प्रगत जीवसृष्टी असावी याबाबतचे कयास लावले जात आहेत.

अंतराळाच्या अफाट पसार्‍यात केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे असे म्हणणे हे विहिरीतील बेडकाच्या वृत्तीसारखेच आहे. या बेडकाने समुद्र पाहिलेला नसतो आणि जग म्हणजे आपली विहीर असाच त्याचा संकुचित विचार असतो.

आपली पृथ्वी ज्या सौरमालिकेत आहे अशा लाखो सौरमालिका ‘मिल्की वे’ नावाच्या आपल्या आकाशगंगेत आहेत. ‘मिल्की वे’ सारख्या लाखो आकाशगंगा अंतराळाच्या आदि-अंताचा ठाव न लागणार्‍या पसार्‍यात आहेत.

त्यामुळे इतक्या मोठ्या ब्रह्मांडात केवळ पृथ्वी नावाच्या एकाच ग्रहावर जीवसृष्टी असेल असे म्हणता येणे कठीण आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून आपले संशोधक परग्रहांवरील जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. आता नेदरलँडमधील एका कमी फ्रिक्‍वेन्सी असलेल्या अँटिनाने अंतराळातून आलेले रेडिओ सिग्‍नल्स पकडले आहेत.

याबाबतची माहिती ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. अंतराळातील काही छुपे ग्रह असावेत असे या सिग्‍नल्सवरून संशोधकांना वाटते. जगातील सर्वात शक्‍तिशाली रेडिओ अँटेनाच्या सहाय्याने हे सिग्‍नल्स पकडले आहेत. या सिग्‍नल्सनी संशोधकांना चकीत केले आहे. ब्रह्मांडात पृथ्वीशिवायही अन्यत्र जीवसृष्टी असावी असे यामुळे संशोधकांना वाटत आहे.

क्‍वीन्सलँड युनिव्हर्सिटीचे डॉ. बेंजामिन आणि त्यांच्या टीमचे म्हणणे आहे की छुप्या ग्रहांचा छडा लावण्यासाठीच्या या नव्या तंत्रामुळे ब्रह्मांडातील जीवसृष्टीचा, परग्रहवासीयांचा छडा लावता येऊ शकेल. संशोधकांनी 19 लाल, खुजा तार्‍यांजवळून आलेल्या चार सिग्‍नल्सना पकडले आहे. या तार्‍यांच्या आजुबाजूला अनेक ग्रह आहेत. तेथून हे सिग्‍नल्स आले असावेत असे संशोधकांना वाटते.

Back to top button