पेपर फुटीप्रकरणी YSRTP च्या प्रमुख वायएस शर्मिला यांना अटक, कारवाईवेळी धक्काबुक्की (व्हिडिओ) | पुढारी

पेपर फुटीप्रकरणी YSRTP च्या प्रमुख वायएस शर्मिला यांना अटक, कारवाईवेळी धक्काबुक्की (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन : तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी (TSPSC question paper leak case) तेलंगणा पोलिसांनी वायएसआरटीपी (Yuvajana Sramika Rythu Congress Party) प्रमुख वायएस शर्मिला यांना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान वायएस शर्मिला यांचा पोलिसांशी वाद झाला. पोलिसांनी त्यांना त्यांच्या घराबाहेर पडण्यापासून रोखल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी शर्मिला यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी पोलीस कारवाईला विरोध केल्याने धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचे व्हि़डिओ एएनआय वृत्तसंस्थेने ट्विट केले आहेत.

बेरोजगारी प्रश्नी धरणे आंदोलनासाठी निघालेल्या शर्मिला यांना पोलिसांनी थांबवले आणि घराबाहेर पडण्यापासून रोखले होते. यावरुन त्यांचा पोलिसांशी वाद झाला. या घटनेच्या व्हिडिओमध्ये शर्मिला यांनी त्यांना अडवणाऱ्या महिला कॉन्स्टेबलला धक्काबुक्की केल्याचे दिसते. राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्यावरुन शर्मिला यांनी आवाज उठवला आहे. मात्र, पोलिसांनी त्यांच्या धरणे आंदोलनाला परवानगी नाकारल्याने शर्मिला यांना उच्च न्यायालयात जावे लागले होते.

या घटनेने लोटस पॉण्ड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शर्मिला यांनी राज्यातील बेरोजगारीच्या मुद्द्यांवर सत्ताधारी बीआरएस (Bharat Rashtra Samithi) सरकारवर टीका केली होती. शर्मिला यांच्या अटकेने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

संबंधित बातम्या

हे ही वाचा :

Back to top button