

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यातील संघर्षामुळे हाहाकार उडालेल्या आफ्रिका खंडातील सुदान देशामध्ये हजारो भारतीय लोक अडकले असून त्यांची सुटका करण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीस परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर तसेच हवाई दल, नौदल, परराष्ट्र खाते आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एस. जयशंकर हे सध्या गयाना देशाच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आभासी मार्गाने बैठकीत सहभाग घेतला होता. सुदानमधील गृहयुध्दात आतापर्यंत 270 लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका भारतीयाचा समावेश आहे. सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी मोहिम हाती घेतली जाऊ शकते का, या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सुदानमधल्या खार्टुम शहरात स्थिती जास्त चिंताजनक असून येथून बहुतांश लोकांनी पलायन केलेले आहे.
हेही वाचा