अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौरला विमानतळावर रोखले, ब्रिटनला जाताना घेतले ताब्यात | पुढारी

अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौरला विमानतळावर रोखले, ब्रिटनला जाताना घेतले ताब्यात

पुढारी ऑनलाईन : ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग याची पत्नी किरणदीप कौर हिला अमृतसर येथील श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्रिटनला जात असताना रोखले. तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते. किरणदीप कौर दुपारी अडीच वाजता एअर इंडियाच्या विमानाने बर्मिंगहॅमला जाणार होती. तिने दुपारी १२:२० वाजता इमिग्रेशन काउंटरला कळवले आणि एलओसीचा विषय असल्याने इमिग्रेशन विभागाने तिला प्रवास करण्याची परवानगी दिली नाही आणि तिला ताब्यात घेतले. २८ वर्षीय किरणदीपची पंजाब पोलिसांनी गेल्या महिन्यात चौकशी केली होती. तिला तिच्या पतीच्या ठावठिकाणाबद्दल विचारण्यात आले होते.

‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग याचा मुख्‍य सहकारी जोगा सिंग याला नुकतीच पोलिसांनी अटक केली. त्‍याला गेल्या शनिवारी सरहिंद येथे अटक करण्यात आली होती. खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर हिला गुरुवारी ब्रिटनला जाण्यापासून रोखण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी किरणदीपला तिच्या पतीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन तिला चौकशीसाठी थांबवले आहे. हल्लीच एका मुलाखतीत किरणदीपने दावा केला होता की तिला अमृतपाल सिंगचा ठावठिकाणा माहीत नाही. दरम्यान, तिने पोलिस ज्या प्रकारे फरारी व्यक्तीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत ते बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते.

१८ मार्च रोजी फरार झालेला वारिस पंजाबदेचा म्होरक्या खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. अमृतपाल धार्मिक ठिकाणी लपल्याचे सांगण्यात येते. यामुळे अमृतसर सुवर्ण मंदिरासह पंजाबच्या सर्वच धार्मिक स्थळांलगत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे अमृतपालने नुकताच एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात त्याने शरणागती पत्करणार नसल्याचे म्हटले आहे.

पंजाबमधील ३०० हून अधिक डेर्‍यांत अमृतपालसाठी पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. जालंधर, कपूरथला, होशियारपूर व भटिंडातील डेरे पोलिसांच्या रडारवर आहेत. पालच्या शोधासाठी ड्रोनचाही वापर केला जात आहे. अमृतपाल आपली इनोव्हा होशियारपूरमध्ये सोडून स्विफ्ट कारमधून फरार झाला होता. या कारच्याही शोधात पोलिस आहेत.

मी पळपुटा नाही. मी परदेशातही पळून जाणार नाही. लवकरच समोर येईन, असे जारी केलेल्या व्हिडीओ, ऑडिओ टेपमध्ये अमृतपाल याने म्हटलेले आहे. अमृतपालचा दुसरा व्हिडीओ कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, दुबई, जर्मनी, अमेरिकेच्या ८ आयपी अ‍ॅड्रेसवरून इंटरनेटवर टाकण्यात आला आहे.

हे ही वाचा :

Back to top button