पुढारी ऑनलाईन: देशभरातील अनेक राज्यांत पुढचे ४ ते ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. वायव्य भारतासह मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतातील काही भागांत तापमान वाढणार असल्याची शक्यता (Heat Waves Alerts by IMD) हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे देशभरातील उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष नको असा इशारा IMD मुंबई ने दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे काही दिवस देशभरातील तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. काही भागात तापमान हळूहळू वाढून तुरळक पाऊस पडणार असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १८ ते १९ एप्रिल दरम्यान पूर्व पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये उष्णतेची लाट आहे. पुढील २४ तासांत सिक्कीम, ओडिशामध्ये तर १८ ते १९ एप्रिल दरम्यान झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. दक्षिणेकडील आंध्रप्रदेशमध्ये आणि पुदुच्चेरीमधील यानम शहरात देखील पुढचे दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता (Heat Waves Alerts by IMD) हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात देखील पुढील २ दिवस उष्णता वाढणार असल्याचे हवामान विभागाने दिलेल्या माहितीत सांगितले आहे. पुढच्या दोन दिवसात २ ते ३ अंशाने तापमान वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पुढचे पाच दिवस ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडणार, असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
MD नुसार दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज (दि.१८) पाटणा विमानतळावर ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या उच्च तापमानवाढ आणि उष्णतेच्या लाटेने लोक त्रस्त झाले आहेत. पाटण्यामध्ये उष्णतेची लाट सुरू झाली आहे. तापमान वाढत आहे आणि दिवसा काम करणे कठीण होत आहे. लोकांनी खबरदारी घ्यावी, असे पाटण्यातील स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
केरळमध्ये दररोज सरासरी तापमानात वाढ होत आहे. आज आम्ही कोट्टायममध्ये ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले आहे. दरम्यान या तापमान वाढीवर बोलताना, ट्रॉपिकल इन्स्टिट्यूट ऑफ इकोलॉजिकल सायन्सचे संचालक डॉ पुननन कुरियन यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी या स्थितीचे प्रमुखे कारण हे ग्लोबल वार्मिंग असल्याचे म्हटले आहे. तसेच यावर अल्पकालीन उपाय नसून, आपण आपल्या सभोवताली अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत असे त्यांनी म्हटले आहे.