अतिक अहमदची हत्‍या करणार्‍यांचाही एन्‍काऊंटर होईल : बसपा खासदार अन्‍सारी | पुढारी

अतिक अहमदची हत्‍या करणार्‍यांचाही एन्‍काऊंटर होईल : बसपा खासदार अन्‍सारी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कुख्‍यात गँगस्‍टर अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अशरफ या दोघांची शनिवारी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली. पोलीस दोघांना प्रयागराज येथील कोल्विन रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जात असताना हल्‍लेखोरांनी त्‍यांच्‍यावर अंदाधूंद गोळीबार केला. या घटनेने उत्तर प्रदेशमध्‍ये खळबळ माजली आहे. दरम्‍यान, माफिया डॉन मुख्तार अन्सारीचा भाऊ आणि बहुजन समाज पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अतिकची हत्‍या करणार्‍यांचाही एन्‍काऊंटर होईल

उत्तर प्रदेशमध्‍ये शनिवारी रात्री घडलेल्‍या घटनेनंतर लोकांचा व्यवस्थेवर विश्वास राहील का, असा सवाल करत अफजल अन्‍सारी म्‍हणाले की, या घटनेचा तपास एखाद्या स्‍वतंत्र एजन्सीकडे द्यावा आणि सत्य बाहेर येण्यापूर्वी अतिकच्या मारेकऱ्यांचाही एन्‍काऊंटर होईल. आरोपींना चकमकीत ठार करुन सत्‍य दडपले जाण्‍याचा प्रयत्‍न होईल, असा आरोपही
त्‍यांनी केला.

घटनेच्‍या चौकशीसाठी ३ सदस्‍यीय न्‍यायिक आयोगाची स्‍थापना

अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अशरफ या दोघांच्‍या हत्येचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 3 सदस्यीय न्यायिक आयोगाची स्थापना केली आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. अरुण मौर्य (रा. कासगंज ), लवलेश तिवारी ( रा. बांदा) आणि सनी ( रा. हमीरपूर ) अशी आरोपींची नावे आहेत.

हत्येसाठी वापरलेले पिस्तूल तुर्कस्तान मेड पिस्‍तुल

अतिक आणि अशरफ यांच्या हत्येत जिगाना बनावटीचे पिस्तूल वापरण्यात आले आहे. हे पिस्तूल तुर्कस्तानमध्ये बनवले असून बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून येथे आणले जाते. भारतात या पिस्तुलावर बंदी आहे. त्याची किंमत सुमारे ६ ते ७ लाख रुपये आहे.
अहवाल घेऊन पोलीस महासंचालक मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक आरके विश्वकर्मा यांना अहवाल सादर करण्‍याचे आदेश दिले होते. त्‍यानुसार विश्‍वकर्मा अहवाल घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मुख्‍यमंत्री राज्‍यातील कायदा व सुव्‍यवस्‍थेची माहिती घेणार आहेत.

हेही वाचा :

 

Back to top button