प्रयागराज, पुढारी ऑनलाईन : Atiq Ahmed Shot Dead : माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तुरुंगात असलेल्या दोन्ही भावांना प्रयागराज येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेले जात असताना तीन मारेक-यांनी माफिया भावांवर गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात अतिक-अशरफचा मृत्यू झाला.
उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम उर्फ अशरफ यांची शनिवारी (15 एप्रिल) रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अतिक आणि अशरफ यांच्यासह उमेश पाल हत्याकांडातील 6 आरोपी गेल्या 51 दिवसांत ठार झाले आहेत. याआधी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 4 आरोपी मारले गेले होते. यामध्ये 13 एप्रिल रोजी झाशी येथे झालेल्या चकमकीत अतिक अहमदचा मुलगा असदचा मारला गेला होता. मृतांपैकी तीन जण अतिकच्या कुटुंबातील आहेत. (Atiq Ahmed Shot Dead)
त्याआधी गुरुवारी उमेश पाल खून प्रकरणातील फरारी आरोपी असद अहमद हा पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला होता. असद हा माफिया अतिक अहमदचा मुलगा होता. मुलाचा एन्काऊंटर झाल्याचे समजताच माफिया अतिक अहमद न्यायालयातच धाय माकलून रडला होता.
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या होण्यापूर्वी 51 दिवसांपूर्वी 24 फेब्रुवारी रोजी राजपाल हत्याकांडाचा मुख्य साक्षीदार उमेश पाल आणि त्याचे दोन बॉडीगार्ड यांची हत्या झाली होती. या प्रकरणात अतिक अहमदला पहिल्यांदाच जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यानंतर उमेश पाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम झाशी येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले. या घनेनंतर दोन दिवसांनी अतिक आणि अशरफ यांची पोलिसांच्या उपस्थितीत हत्या करण्यात आली. (Atiq Ahmed Shot Dead)
25 फेब्रुवारी 2005 रोजी प्रयागराज (तेव्हाचे अलाहाबाद) येथील बहुजन समाज पक्षाचे विद्यमान आमदार राजू पाल यांची हत्या करण्यात आली. अतिक अहमद आणि अशरफ यांच्यावर हत्येचा आरोप होता. उमेश पाल हा या खून खटल्यातील महत्त्वाचा साक्षीदार होता. 24 फेब्रुवारी रोजी प्रयागराजमध्ये उमेश पाल यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
जया पाल यांनी पती उमेश पाल यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी अतिक अहमद, अशरफ, अतिकची पत्नी शाइस्ता परवीन, अतिकची दोन मुले, सहकारी गुड्डू मुस्लिम, गुलाम आणि इतर 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या खटल्यात अतिकला मुख्य आरोपी करण्यात आले.
उमेश पाल खून प्रकरणातील एक आरोपी शाईस्ता परवीन अजूनही पोलिसांच्या यादीत फरार असून तिच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. अतिकच्या दोन अल्पवयीन मुलांना ज्युवेनाइल होममध्ये ठेवण्यात आले आहे.
उमेश पाल खून प्रकरणातील पहिल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांनी मारले. 27 फेब्रुवारीला अरबाजला पोलिसांनी चकमकीत ठार मारले. अरबाजवर 24 फेब्रुवारीला मारेकऱ्यांची कार चालवल्याचा आरोप आहे. खून प्रकरणातील आणखी एक आरोपी उस्मान हा 6 मार्च रोजी कथित चकमकीत मारला गेला.
उमेश पाल हत्येप्रकरणी पोलिसांनी 13 एप्रिल रोजी झाशी येथे अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा सहकारी गुलाम यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण असद आणि गुलामने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरात केलेल्या पोलिसांच्या गोळीबारात असद आणि गुलाम हे दोघे ठार झाले.