IT Raid : आयकर विभागाचा औषध कंपनीवर छापा, सापडली १४२ कोटीची रोकड! | पुढारी

IT Raid : आयकर विभागाचा औषध कंपनीवर छापा, सापडली १४२ कोटीची रोकड!

 

हैदराबाद : पुढारी ऑनलाईन

आयकर विभागाने नुकताच हैदराबाद येथील एका औषध निर्माण कंपनीवर छापा ( IT Raid ) टाकला. या छाप्यात 550 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, छाप्यानंतर आयकर विभागाने 142 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम वसूल केली आहे. या छापेमारीदरम्यान अनेक बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून करण्यात आलेल्या खरेदीबाबत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच ‘आयकर’ने छाप्यावेळी डिजिटल उपकरणे, पेन ड्राईव्ह, अनेक कागदपत्रे जप्तही केल्याचे समजते.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या मते, हैदराबाद येथील एका प्रसिद्ध औषध निर्माण कंपनीवर 6 ऑक्टोबर रोजी छापेमारी ( IT Raid ) करण्यात आली होती. यादरम्यान अधिकाऱ्यांना सुमारे 550 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न सापडले आहे. अघोषित उत्पन्न आणि इतर गोष्टी शोधण्यासाठी अधिक तपास केला जात आहे.

आयकर विभागाने 6 ऑक्टोबर रोजी अर्धा डझन राज्यांमध्ये सुमारे 50 ठिकाणी छापेमारी केली. हैदराबाद येथील एका औषध कंपनीवरही आयकर विभागाचा छापा पडला. ‘आयकर’च्या अधिका-यांनी औषध कंपनीच्या कार्यालयाची झाडाझडती घेतल्यानंतर तेथे एका कपाटात तब्बल 142 कोटी रुपये सापडले. ही औषध कंपनीच्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विदेशात निर्यात होते. यात अमेरिका, यूरोपातील काही देश, दुबई आणि इतर आफ्रिकी देशांमध्ये कंपनीच्या उत्पादनांची निर्यात होते.

 

Back to top button