राज्यात कोरोना वाढतोय; चाचण्या कधी वाढणार?

राज्यात कोरोना वाढतोय; चाचण्या कधी वाढणार?

पुणे : राज्यात कोरोना वाढू लागल्याने महापालिकेने तपासणीची यंत्रणा वाढवावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्या आहेत. पुण्यात दररोज 300 ते 350 इतक्याच कोरोना चाचण्या होत आहेत. कोरोना नियंत्रणासाठी चाचण्या तातडीने वाढवण्याची आवश्यकता असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

गेल्या तीन वर्षांत उन्हाळ्यात मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले. हवामानातील बदल, विषाणूंचे बदलते स्वरूप, वाढीस पोषक वातावरण आदी कारणांमुळे संसर्ग वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मास्क वापरण्याचे, लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले जात आहे.

पालिकाहद्दीत सध्या 12 नमुना संकलन केंद्रे (स्वॅब सेंटर) कार्यरत आहेत. महापालिका केंद्रांवर 1 ते 9 एप्रिल या कालावधीत 681 नमुन्यांचे संकलन करून ते चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये नऊ दिवसांमध्ये 2156 नमुने संकलित करण्यात आले. महापालिका केंद्रांवरील नमुने चाचणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळा आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवले जात आहेत. आरटीपीसी आर आणि अँटिजेन टेस्टिंग वाढवल्यास रुग्णांचे लवकरात लवकर निदान करता येईल आणि कोरोना नियंत्रणात ठेवता येईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोरोना चाचण्यांचे प्रमाण
दिवस चाचण्या
5 एप्रिल 321
6 एप्रिल 418
7 एप्रिल 342
8 एप्रिल 303
9 एप्रिल 363

शहरातील स्वॅब संकलन केंद्रे
खेडेकर हॉस्पिटल (बोपोडी), सोनावणे प्रसूतिगृह (भवानी पेठ), अण्णासाहेब मगर रुग्णालय ( हडपसर), सावित्रीबाई फुले केंद्र (कोंढवा), सुतार दवाखाना (कोथरूड), गलांडे पाटील हॉस्पिटल
(नगर रस्ता), दळवी हॉस्पिटल (शिवाजीनगर), गाडगीळ हॉस्पिटल (सिंहगड रस्ता), लायगुडे हॉस्पिटल (सिंहगड रस्ता), कळस
हॉस्पिटल (येरवडा), नायडू हॉस्पिटल (ढोले पाटील रस्ता),
शिवशंकर हॉस्पिटल (वानवडी).

मार्च महिन्यात दररोजच्या चाचण्यांचे प्रमाण 100-150 इतके होते. आता दररोज 300 ते 350 कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. सध्या रुग्णांचे प्रमाण पाहता एवढ्या चाचण्या पुरेशा आहेत. महापालिकेकडे अँटिजेन टेस्टसाठी 3 लाख 25 हजार किट उपलब्ध आहेत.

                      – डॉ. सूर्यकांत देवकर, साथरोग अधिकारी, पुणे महापालिका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news