कर्नाटक विधानसभा रणधुमाळी- 2023 : भाजप 14 आमदारांना वगळणार | पुढारी

कर्नाटक विधानसभा रणधुमाळी- 2023 : भाजप 14 आमदारांना वगळणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  निवडून येण्याची क्षमता याच निकषावर भाजप उमेदवार निवड प्रक्रिया राबवत असताना किमान सहा नेत्यांनी आपल्याच नातेवाईकांसाठी उमेदवारीचा आग्रह धरल्यामुळे भाजपची यादी निश्चित होईनाशी झाली आहे. या नेत्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यांच्यासह 14 आमदारांना वगळण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे समजते. मात्र अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतरच ते आमदार कोण, हे स्पष्ट होईल. रविवारी सकाळी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक होऊनही ही यादी अपुरी राहिली.

मतदारसंघात घेतलेला कानोसा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेल्या सुचनेनुसार विजयाची खात्री नसलेल्या 14 आमदारांचा पत्ता कट करण्यात येणार आहे. भाजपच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. समितीची रविवारी सकाळी पुन्हा बैठक झाली. त्यात उमेदवार निवडीसाठी मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा करण्यात आली. संध्याकाळी संसदीय मंडळाची बैठक झाली. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ज्येष्ठ नेते अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष आदी उपस्थित होते. या बैठकीत पक्षाच्या राज्य कोअर कमिटीने सादर केलेल्या संभाव्य उमेदवारांची यादी आणि त्यावर आधारित भाजपच्या केंद्रीय उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशींवर चर्चा करण्यात आली. सत्ताविरोधी लाटेपासून बचाव करण्यासाठी किनारपट्टीलगतच्या पाचहून अधिक मतदारसंघांमध्ये नवीन चेहर्‍यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

घराणेशाही

घराणेशाहीचा वारसा पुढे चालवण्यासाठी भाजपच्या अनेक वरिष्ठांनी दिल्लीत तळ ठोकून पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे भाजप कोंडीत सापडला आहेे. खासदार करडी संगण्णा, जी. एम. सिद्धेश्वर, पी. सी. मोहन, के. एस. ईश्वरप्पा, व्ही. सोमण्णा, मुरुगेश निरानी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांना तिकीट मिळावे, यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत.

यांचा पत्ता कट होणार?

शिमोगा मतदारसंघाचे विद्यमान आमदार के. एस. ईश्वरप्पा, भटकळचे आमदार सुनील नाईक, पुत्तूरचे संजीव मठंंदूर, कापू येथील लालाजी मेंडन, उडुपी येथील रघुपती भट, चिक्कपेट येथील उदय गरुडाचार, बसवनगुडी येथील रवी सुब्रमण्य, सिरुगुप्प येथील सोमलिंगप्पा, शिरहट्टी येथील रामण्णा लमाणी, गुलबर्गा उत्तर येथील बसवराज मत्तीमूड, रोण येथील कळकप्पा, बैंदूर येथील सुनीलकुमार शेट्टी, कुंदापूर येथील हलाडी श्रीनिवास शेट्टी, होसदुर्ग येथील बी.एच. तिप्पारेड्डी, मुदिगेरे येथील एम. पी. कुमारस्वामी यांचा पत्ता कट होणार आहे.

यादी आज किंवा उद्या

नवी दिल्ली : कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची शनिवारी मॅरेथॉन बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर ही यादी सोमवार किंवा मंगळवारी जाहीर केली जाणार असल्याचे समजते. उमेदवार निवडीसंदर्भात पक्ष मुख्यालयात झालेल्या बैठकीस पंतप्रधानांसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, ज्येष्ठ नेते बी. एस. येदीयुराप्पा, प्रदेश भाजपचे अध्यक्ष नलीनकुमार कटील आदी नेते हजर होते. 10 मे रोजी होणारी कर्नाटकची विधानसभा निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळेच उमेदवार निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सोमवार किंवा मंगळवारपर्यंत यादी जाहीर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

Back to top button