भारताने दिला चीन-पाकिस्‍तानला झटका, श्रीनगरमध्‍ये होणार्‍या G-20 बैठकीची तारीख ठरली | पुढारी

भारताने दिला चीन-पाकिस्‍तानला झटका, श्रीनगरमध्‍ये होणार्‍या G-20 बैठकीची तारीख ठरली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीन आणि पाकिस्‍तानाकडून सुरु असणार्‍या कांगाव्‍याकडे दुर्लक्ष करत भारताने श्रीनगरमध्‍ये होणार्‍या G-20 बैठकीच्‍या तारीख निश्‍चित केल्‍या आहेत. ही बैठक २२ ते २४ मे दरमान्‍य श्रीनगरमध्‍ये होणार आहे. भारतातील विविध राज्‍यांमध्‍ये टी-२० बैठका होत आहेत. मात्र जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमधील बैठकांवर चीन आणि पाकिस्‍तानने थयथयाट सुरु केला होता. याला आता भारताने चोख प्रत्‍युत्तर दिले आहे.

गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीवर चीनने आक्षेप घेत प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली होती. तसेच अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांचे नाव बदलून थयथयाट केला होता. पाकिस्तानने श्रीनगरमधील जी-20 बैठक घेण्‍यात येवू नये यासाठी सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि चीनसारख्या गटातील आपल्या मित्रपक्षांची मदत घेतली होती.

श्रीनगरमध्‍ये होणार्‍या बैठकीची तारीख जाहीर करुन भारताने दिले चोख प्रत्‍युत्तर

भारताने शुक्रवारी श्रीनगरमध्‍ये होणार्‍या G-20 देशांच्या बैठकीबाबत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. पर्यटनावरील G-20 कार्यगटाची बैठक २२ ते २४ मे दरम्यान श्रीनगरमध्ये होईल, असे भारताच्‍यावतीने स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. टाईम्‍स ऑफ इंडियाने दिलेल्‍या वृत्तानुसार, G-20 बैठकीची तयारी मागील वर्षीच सुरू झाली होती. देशातील सर्व २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये G-20 बैठका होत आहेत. अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर हे दोन्ही भारताचे अविभाज्य भाग आहेत, त्यामुळे भारताने आता श्रीनगरमधील बैठकीच्‍या तारखा जाहीर करत चीन आणि पाकिस्‍तानला चोख प्रत्‍युत्तर दिले आहेत.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button