Bihar Legislative Council : बिहार विधान परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष; संख्याबळ २४ वर | पुढारी

Bihar Legislative Council : बिहार विधान परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष; संख्याबळ २४ वर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहार विधान परिषद (Bihar Legislative Council)  निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. ७५ सदस्य संख्या असलेल्या विधान परिषदेत भाजपच्या आता २४ जागा झाल्या आहेत. तर जेडीयूची २४ जागांवरून २३ अशी घसरण झाली आहे. ५ जागांसाठीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालात भाजपने एक जागा कायम ठेवली आहे. तर एक जागा जिंकली आहे. गया शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात भाजपने दोन जागा जिंकल्या. त्याचवेळी कोसी आणि सारण पदवीधर मतदारसंघात नितीश कुमार यांच्या महाआघाडीचा विजय झाला. दुसरीकडे सारण शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. येथे त्यांनी सीपीआयच्या उमेदवाराचा पराभव केला.

बिहार विधान परिषदेच्या (Bihar Legislative Council) ५ जागांवर निवडणूक झाली. त्यापैकी महाआघाडीने दोन जागा जिंकल्या. तर एक जागा भाजपच्या तर दुसरी अपक्षांच्या हाती गेली. दुसरीकडे भाजपने एक जागा राखली आणि जनता दल युनायटेडची दुसरी जागा जिंकून तीही आपल्या खात्यात जमा केली.

विधान परिषद सभागृहात सर्वात मोठा पक्ष झाल्याचा आनंद भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. महाआघाडीत एकूण सात पक्षांचा समावेश आहे, त्यापैकी सीपीआय, सीपीआय (एमएल) आणि सीपीआय(एम) या पक्षांनी नितीश कुमार सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे.

अपक्ष उमेदवार म्हणून अफाक अहमद यांनी सीपीआयच्या आनंद पुष्कर यांचा पराभव केला आणि सारण शिक्षक मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. पुष्कर यांचा वडील केदारनाथ पांडे हे सीपीआयचे दिग्गज नेते होते. त्यांनी सलग अनेक वेळा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. अफाक अहमद यांना बिहारमध्ये ‘जन सूरज अभियान’ चालवणाऱ्या प्रशांत किशोर यांनी पाठिंबा दिला होता.

हेही वाचा 

Back to top button