Parliament session : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वाजले सूप, गदारोळामुळे दुसऱ्या टप्प्यात झाले नाही एकही दिवस कामकाज

Parliament Monsoon Session
Parliament Monsoon Session

 नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अखेर गदारोळातच आज (दि.६) सूप वाजले. विरोधी पक्षांबरोबर सत्ताधाऱ्यांनीही उभय सदनांत घातलेल्या प्रचंड गदारोळामुळे अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन केली जावी, या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी संसदेत राडेबाजी केली तर विदेशात केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी देशवासियांची माफी मागावी, याकरिता सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी संसदेला वेठीस धरले. (Parliament session)

लोकसभेत आज (दि.६) सकाळी ११ वाजता कामकाज सुरु होताच काॅंग्रेससह इतर विरोधी सदस्यांनी आपापल्या मागण्यांसाठी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी मागण्यांचे फलकही दाखविले जात होते. यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता होत असल्याची घोषणा केली. यावेळी सदनात जे प्रमुख नेते उपस्थित होते, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा समावेश होता. भाजपचा स्थापना दिवस असल्याने सत्ताधारी पक्षाच्या असंख्य खासदारांनी भगवी वस्त्रे परिधान केली होती. तर विरोधी गोटाच्या काही सदस्यांनी काळी वस्त्रे परिधान केली होती.

अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. तर दुसऱ्या टप्प्यात त्याला मंजुरी देण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाला १३ मार्चपासून सुरुवात झाली होती. मात्र उभय सदनांत गदारोळ आणि घोषणाबाजीमुळे  एकही दिवस कामकाज चालू शकले नाही. अधिवेशन काळात मोदी आडनावावरुन आक्षेपार्ह केल्याबद्दल दोन वर्षांची शिक्षा झालेल्या राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्दबातल केली होती.

Parliament session :लोकसभेत 45 तास तर राज्यसभेत 31 तास कामकाज

अधिवेशन काळात लोकसभेत 133.6 तासांपैकी 45 तास कामकाज चालले. दुसरीकडे राज्यसभेत 130 तासांपैकी केवळ 31 तास कामकाज चालले. लोकसभेची कामकाज उत्पादकता 34.28 टक्के इतकी राहिली तर राज्यसभेची कामकाज उत्पादकता 24 टक्के इतकी राहिली. गदारोळामुळे प्रश्नोत्तराचा तास तसेच शून्य प्रहराचे कामकाज वाया गेले. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास केवळ 4.32 तास चालू शकला तर राज्यसभेत हेच प्रमाण अवघे 1.85 तास इतके होते.
लोकसभेत अर्थसंकल्पावर 14.45 तास चर्चा झाली. या चर्चेत 145 खासदारांनी सहभाग घेतला होता. दुसरीकडे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा 13 तास 44 मिनिटे चालली. यात 143 खासदारांनी सहभाग घेतला होता. लोकसभेत आठ विधेयके सादर करण्यात आली तर सहा विधेयके मंजूर करण्यात आली.
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news