मानहानीकारक प्रकरण : राहुल गांधी शिक्षेला आव्हान देणार | पुढारी

मानहानीकारक प्रकरण : राहुल गांधी शिक्षेला आव्हान देणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मानहानीकारक खटल्यात दोषी ठरवत सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधी यांना आपली खासदारकीही गमवावी लागली आहे. दरम्यान, या निकालाला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असून राहुल गांधी सोमवारी सुरत सत्र न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने नुकतेच दोषी ठरवल्यानंतर त्यांनी लोकसभेचे सदस्यत्व गमावले आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना सत्र न्यायालयात अपिलाच्या प्रसंगी उपस्थित राहायचे आहे. त्यामुळेच पक्षाच्या बड्या नेत्यांना गुजरातमध्ये पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. वरिष्ठ न्यायालयात अपीलसह अन्य पर्यायांवरही निर्णय घेतला जाऊ शकतो, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.

शिक्षा जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरवर पोस्ट केली की, माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा देव आहे. अहिंसा हे साध्य करण्याचे साधन आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह अनेक पक्षांच्या नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा 

Back to top button