राहुल गांधी ‘खासदारकी रद्द’ प्रकरणी जर्मनीच्या टिप्पणीवरुन काँग्रेस-भाजप आमने-सामने | पुढारी

राहुल गांधी 'खासदारकी रद्द' प्रकरणी जर्मनीच्या टिप्पणीवरुन काँग्रेस-भाजप आमने-सामने

नवी दिल्ली:पुढारी वृत्तसेवा; राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होण्याच्या प्रकरणात जर्मनीने केलेल्या टिप्पणीवरुन काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. ‘गांधी प्रकरणात जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेली टिप्पणीबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो’, असे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी सांगितले होते. त्याला उत्तर देताना कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमधील विदेशी हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी जाण्याच्या प्रकरणात आधी अमेरिकेने प्रतिक्रिया देताना भारतातील घडामोडींवर आमचे लक्ष असल्याचे सांगितले होते. त्यानंतर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणात न्यायालयीन स्वातंत्र्याची मानके आणि लोकशाहीच्या सिध्दांताचा अवलंब झाला पाहिजे, अशी टिप्पणी केली होती. जर्मन परराष्ट्र मंत्रालयाला आम्ही त्यांच्या टिप्पणीबद्दल धन्यवाद देतो, असे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी त्यावर सोशल मीडीयाच्या माध्यमातून सांगितले होते. तर याला प्रत्युत्तर देताना किरेन रिजिजू यांनी ‘देशातील अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी विदेशी शक्तींना आमंत्रण दिल्याबद्दल राहुल गांधी यांचे अभिनंदन’, असा टोमणा मारला आहे.

केंद्रीय मंत्र्यांना अशी दादागिरी शोभत नाही : वकिलांचे पत्र……..

दरम्यान ‘काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी टोळ्यांचा भाग झाले आहेत’, या रिजिजू यांच्या वक्तव्याबद्दल तीनशेपेक्षा जास्त वकिलांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्र्यांना अशा प्रकारची दादागिरी शोभत नाही, असे सांगत संबंधित वकिलांनी रिजिजू यांना खुले पत्र लिहिले आहे. केंद्रीय मंत्र्यांसारख्या उच्च पदस्थांना अशा प्रकारचा उद्दामपणा आणि दादागिरी शोभत नाही. सरकारवरची टीका जशी राष्ट्रविरोधी नाही तशी ती देशद्रोही नाही. न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये सरकारचा हस्तक्षेप असावा, असे तुम्हाला वाटते. पण काॅलिजियममध्ये असा कोणताही नियम नाही, हे लक्षात घ्यावे, असेही वकिलांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button