Karnataka Election 2023 | कर्नाटक विधानसभा निवडणुकीआधीच 'जेडीएस'ला धक्का, आमदार एटी रामास्वामींचा भाजपमध्ये प्रवेश | पुढारी

Karnataka Election 2023 | कर्नाटक विधानसभा निवडणुकीआधीच 'जेडीएस'ला धक्का, आमदार एटी रामास्वामींचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : कर्नाटक विधानसभा निवडणूक तोंडावर असताना जेडीएसला JD(S) मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकातील अर्कलगुड येथील जेडीएसचे ज्येष्ठ आमदार एटी रामास्वामी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. रामास्वामी यांनी याआधी आमदारकीचा राजीनामा विधानसभा सचिवांकडे सुर्पूद केला होता.

या आठवड्यात आमदारकीचा राजीनामा देणारे रामास्वामी हे जेडीएसचे दुसरे आमदार आहेत. २७ मार्च रोजी पक्षाचे आणखी एक आमदार एस आर श्रीनिवास (गुब्बी श्रीनिवास उर्फ वासू) यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी गेल्या गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजप ज्या पद्धतीने काम करत आहे त्यामुळे मी खरोखर प्रभावित झालो आहे. मी मनी पॉवरचा बळी आहे कारण मी नेहमी अनियमितता आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलायचो. कोणत्याही अटीशिवाय मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मला फक्त लोकांची सेवा करण्याची संधी हवी आहे, असे एटी रामास्वामी यांनी म्हटले आहे.

“मी जेडीएसला सोडलेले नाही. त्यांनीच मला बाहेर केले आहे. मी मनी पॉवरचा बळी आहे. मी अधिकृतपणे राजीनामा दिला आहे. मला संधी मिळाल्यास लोकांची सेवा करण्यासाठी माझी निवडणूक लढवण्याची इच्छा आहे,” अशी भावना एटी रामास्वामी यांनी राजीनाम्यानंतर व्यक्क केली होती.

हसन जिल्ह्यातील अर्कलगुडचे ते चार वेळा आमदार राहिले आहेत. रामास्वामी यांनी अलीकडील काही दिवसांत पक्षाच्या नेतृत्वाशी असलेल्या मतभेदांबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला असून राज्यात १० मे रोजी एकाच टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. तर १३ मे ला निकाल जाहीर केला जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २२४ जागा असून सत्ताधारी भाजपचे सध्याचे संख्याबळ ११९ इतके आहे. दुसरीकडे काॅंग्रेसचे संख्याबळ ७५ तर कुमारस्वामी यांच्या निजदचे  (जेडीएस) संख्याबळ २५ इतके आहे.

हे ही वाचा :

Back to top button