दु:खद : मध्य प्रदेशमधील मंदिर दुर्घटनेतील मृतांची संख्या 14 वर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आज (दि.३०) रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरु असताना मोठी दुर्घटना घडली. शहरातील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याने 30 हून अधिक भाविक पाण्यात पडले. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १७ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सपना संगीता रोडवरील स्नेह नगर येथे मंदिरात होम सुरू असताना हा अपघात झाला. कन्यापूजनाचा कार्यक्रम असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी होती. विहिरीच्या छतावर ३० हून अधिक लोक बसले होते. अतिरिक्त वजनामुळे विहिरीचे छत तुटले. ३० हून अधिक भाविक ४० फूट खाली पडले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बेलेश्वर महादेव मंदिरात घडलेल्या दुर्घटनेची दखल घेतली.
त्यांनी इंदूरचे जिल्हाधिकारी आणि इंदूरच्या आयुक्तांना बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. विहिरीत कोसळलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आले.
आतापर्यंत १७ जणांना विहिरीच्या पायऱ्यांवरून वाचवण्यात यश आले आहे. सुमारे 12 रुग्णवाहिका बचाव कार्यात गुंतल्या आहेत. विहिरीत चार ते पाच फूट पाणी असल्याने बचावकार्यात अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. घटनास्थळी सातत्याने बचावकार्य सुरू आहे. आतमध्ये किती लोक अडकले असतील हे आत्ताच सांगता येणार नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी घेतली दुर्घटनेची माहिती
इंदूरमधील घटनेमुळे मी खूप व्यथित झालो असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिले आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी बोलून परिस्थिती जाणून घेतली. राज्य सरकारचे बचाव आणि मदत कार्यात सुरु आहे.
मंदिर परिसरात खोदकाम
‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मंदिर परिसरात बांधकाम आणि उत्खननाचे काम सुरू आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे विहिरीची भिंत कोसळल्याने फरशी कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय उंदरांमुळे विहीर पोकळ झाल्याचेही स्थानिकांनी सांगितले. मात्र, अपघाताच्या कारणाबाबत अद्याप प्रशासनाने कोणाताही खुलासा केलेला नाही.
हेही वाचा :
- Udayanraje Bhonsle | दिल्लीत छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, उदयनराजेंनी अमित शहांची भेट घेत केली मागणी
- पुरुषांनी स्त्रियांशी कसे वागावे? शिक्षिकेने दिला विद्यार्थ्यांना ‘धडा’ : Viral Video
- Philippines : फिलिपाइन्समध्ये मोठी दुर्घटना; २५० जणांनी भरलेल्या बोटीला आग, ३१ जणांचा मृत्यू, ७ बेपत्ता