BJP Parliamentary Party meeting | भाजपच्या संसदीय पक्ष बैठकीत ईशान्येतील विजयाबद्दल पीएम मोदींचा सन्मान (Video) | पुढारी

BJP Parliamentary Party meeting | भाजपच्या संसदीय पक्ष बैठकीत ईशान्येतील विजयाबद्दल पीएम मोदींचा सन्मान (Video)

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक (BJP Parliamentary Party meeting) आज मंगळवारी दिल्लीत संसदेच्या ग्रंथालय भवनमध्ये झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, मंत्री पियूष गोयल आणि अन्य नेते सहभागी झाले होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या ईशान्येकडील राज्यांच्या निवडणुकांतील विजयाबद्दल भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.

पीएम नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. ६ एप्रिल हा भाजपचा स्थापना दिवस आहे. ६ एप्रिल ते १४ एप्रिल हा सप्ताह सामाजिक न्याय सप्ताह म्हणून साजरा करू, अशी माहिती केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.

भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत समाजकल्याण योजनांवर चर्चा झाली. मन की बात एप्रिलमध्ये १०० वा एपिसोड पूर्ण करेल. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सर्व खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील खास गोष्टी सांगण्यास सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या ईशान्येतील निवडणुकांतील विजयाबद्दल पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करण्यात आले, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे.

भाजपने ईशान्येकडील तीन राज्यांत त्यांचे सरकार स्थापन केले आहे. त्रिपुरात माणिक साहा यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. मेघालय आणि नागालँडमध्ये भाजपने आघाडीतील पक्षांसोबत सरकार स्थापन केले आहे.

ही बैठक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात होत असलेली भाजपची पहिली बैठक आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अर्थसंकल्पीय प्रक्रिया सोमवारी दोन्ही सभागृहात वित्त विधेयक २०२३ मंजूर करून पार पडली. या दरम्यान अदानी प्रकरणी संयुक्त संसदीय चौकशीची विरोधकांनी मागणी केल्याने गदारोळ झाला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवल्याच्या विरोधातही विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

या बैठकीत नुकतेच मंजूर करण्यात आलेले वित्त विधेयक आणि विरोधकांची सुरू असलेली निदर्शने यांसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. (BJP Parliamentary Party meeting)

हे ही वाचा :

Back to top button