Manik Saha take Oath as Tripura CM | डेंटिस्ट ते राजकारणी! त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी माणिक साहा दुसऱ्यांदा विराजमान | पुढारी

Manik Saha take Oath as Tripura CM | डेंटिस्ट ते राजकारणी! त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी माणिक साहा दुसऱ्यांदा विराजमान

आगरतळा (त्रिपुरा) : डेंटिस्ट ते राजकारणी असा प्रवास केलेले भाजप नेते डॉ. माणिक साहा यांनी आज (दि.८) त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. ते मुख्यमंत्रीपदी सलग दुसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. आगरतळा येथील विवेकानंद मैदानावर हा शपथविधी सोहळा झाला. या सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री उपस्थित होते. (Manik Saha take Oath as Tripura CM)

त्रिपुरात भाजपला यश मिळवून देणारे माणिक साहा हे दंत शल्यचिकित्सक आहेत. त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. २०२० मध्ये त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले होते आणि मार्च २०२२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती.
याआधी सोमवारी माणिक साहा यांनी राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची भेट घेऊन राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. गेल्या सोमवारी भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या सर्वसाधारण सभेत साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. “मला विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ‘उन्नत त्रिपुरा, श्रेष्ठ त्रिपुरा’ उभारण्यासाठी आणि सर्व स्तरातील लोकांच्या कल्याणासाठी एकत्र काम करू.” असे साहा यांनी ट्विट करत म्हटले होते.

भाजपने घेतली ३९ टक्के

माणिक साहा यांनी ३ फेब्रुवारी रोजी राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. राज्यपालांनी त्यांना नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार कायम ठेवण्यास सांगितले होते. भाजपने त्रिपुरात ३२ जागा जिंकल्या आहे. भाजपने घेतलेली मते सुमारे ३९ टक्के आहेत. तर राज्यात टिपरा मोथा पक्ष १३ जागा जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला ११ तर काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत. इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) ने १ जागा जिंकून आपले खाते उघडले आहे.

सीपीआय (एम) आणि काँग्रेस हे केरळमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी यावेळी ईशान्येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आले होते. सीपीआय(एम) आणि काँग्रेसने घेतलेली एकूण मते सुमारे ३३ टक्के आहेत.

अन्‌ डाव्या आघाडीकडून भाजपने सत्ता खेचून आणली

विद्यमान मुख्यमंत्री साहा यांनी टाऊन बोर्डोवली मतदारसंघातून काँग्रेसचे आशिष कुमार साहा यांचा १,२५७ मतांनी पराभव केला. ६० सदस्यीय त्रिपुरा विधानसभेत बहुमताचा आकडा ३१ आहे. २०१८ पूर्वी त्रिपुरामध्ये एकही जागा न जिंकलेल्या भाजपने गेल्या निवडणुकीत आयपीएफटीशी युती करून सत्तेत प्रवेश केला आणि १९७८ पासून राज्यात ३५ वर्षे सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीकडून सत्ता खेचून आणली. (Manik Saha take Oath as Tripura CM)

भाजपने विधानसभा निवडणुकीत ५५ जागा लढवल्या आणि त्याचा मित्रपक्ष आयपीएफटीने (IPFT) सहा जागांवर निवडणूक लढवली होती. पण दोन्ही मित्रपक्षांनी गोमती जिल्ह्यातील अँपीनगर मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. डाव्यांनी ४७ आणि काँग्रेसने १३ जागा लढवल्या होत्या. एकूण ४७ जागांपैकी सीपीएमने ४३ जागा लढवल्या तर फॉरवर्ड ब्लॉक, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) आणि रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी) यांनी प्रत्येकी एक जागा लढवली.

सीपीआय(एम) च्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीची सुमारे चार दशके त्रिपुरात सत्ता होती. १९८८ ते १९९३ या काळात काँग्रेस सत्तेत होते. यावेळी दोन्ही पक्षांनी भाजपच्या हातातून सत्ता मिळवण्यासाठी हातमिळवणी केली होती.

रिओ नागालँडचे, संगमा मेघालयाचे नवे मुख्यमंत्री

नेफ्यू रिओ यांनी मंगळवारी पाचव्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मेघालयाच्या मुख्यमंत्रिपदी कोनराड संगमा यांची, तर आता त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदी माणिक साहा विराजमान झाले आहेत. नागालँडमध्ये पुन्हा एकदा एनडीपीपी-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले आहे. नेफ्यू रिओ यांनी शपथविधीनंतर पंतप्रधान मोदींना अभिवादन केले. या युतीने सर्वाधिक ३७ जागा जिंकल्या होत्या. एनडीडीपीने २५ व भाजपने १२ जागांवर विजय मिळवला होता. संगमा सलग दुसर्‍यांदा मेघालयाचे मुख्यमंत्री बनले आहेत. या राज्यात एनपीपी, यूडीपी, भाजप आणि एचएसपीडीपीचे युती सरकार स्थापन झाले आहे.

हे ही वाचा :

Back to top button