Rahul Gandhi : कुणालाही न घाबरता हिंदुस्तानच्या लोकशाहीसाठी लढत राहील : राहुल गांधी | पुढारी

Rahul Gandhi : कुणालाही न घाबरता हिंदुस्तानच्या लोकशाहीसाठी लढत राहील : राहुल गांधी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मानहानी प्रकरणात सुरत न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर तसेच लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेत देशाची लोकशाही धोक्यात असल्याचा दावा केला. हिंदुस्तानच्या लोकशाहीसाठी कुणालाही न घाबरता लढत राहील, अशा आक्रामक पवित्र्यात ते दिसून आले. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते (Rahul Gandhi) म्हणाले, प्रश्न विचारणे बंद करणार नाही. अदानींचे मोदींसोबत काय संबंध आहे? २० हजार कोटी रुपये कुणाचे आहे? हे विचारत राहील. या लोकांची कुठलीही भीती वाटत नाही. अयोग्य कारवाई करीत, धमकी देत, तुरूंगात डांबून ते माझा आवाज दाबू शकतील, असे त्यांना वाटत असेल. तर हा माझा इतिहास नाही. मी हिंदुस्तानच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहील. मी कुठल्याही गोष्टींना घाबरणार नाही, असे शब्दांत राहुल गांधी यांनी त्यांचा आक्रमक पवित्रा दाखवला.

अदानीबाबत करणाऱ्या पुढील भाषणाची भीती पंतप्रधानांना होती. त्यांच्या डोळ्यात ही दहशत मी बघितली. त्यामुळेच मला अयोग्य ठरवण्यात आल्याचे राहुल गांधी म्हणाले. समर्थन करणाऱ्या सर्व विरोधी पक्षांचे आभार व्यक्त करताना ते म्हणाले, सर्वांना सोबत मिळून काम करायचे आहे. सरकारकडून दहशतीत करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे विरोधकांना फायदा मिळेल. माफी मागण्यासंदर्भात राहुल यांना प्रश्न विचारला असता ‘मी गांधी आहे, सावरकर नाही, गांधी कुणाची माफी मागत नाही’ असे उत्तर त्यांनी दिले.

राजकारण माझ्यासाठी फॅशनची गोष्ट नाही. माझ्यासाठी खरं बोलणं काही नवीन बाब नाही. ही माझ्या जीवनाची तपस्या आहे. अयोग्य ठरवले तरी बेहत्तर. मला मारहाण केली, तुरूंगात टाकले तरी चालेल. पंरतु, मी माझी तपस्या करीत राहील. या देशावर माझे प्रेम आहे. यासाठी मला हे सर्व करायचे आहे. वायनाडसोबत माझे स्नेहाचे संबंध आहे. मी संसदेच्या आत आहे की बाहेर मला फरक पडत नाही. मला माझी तपस्या करायची आहे. आणि मी ती करून दाखवेन, असे ते म्हणाले.

हिंदुस्तानच्या लोकशाहीवर हल्ले होत आहेत. नित्यनियमाचे याची उदाहरणे बघायला मिळतात. मी केवळ एकच प्रश्न विचारला होता. अदानी यांच्या शेलकंपन्यांमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूक कुणी केली? अदानी यांचा इन्फ्रास्ट्रक्चर चा व्यवसाय आहे. परंतु, त्यांच्या शेल कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आलेले पैसे कुणाचे आहेत? यासंदर्भात संसदेत पुराव्यासह प्रश्न विचारला होता, असे राहुल गांधी म्हणाले.
सभागृहात अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधांबद्दल विस्ताराने बोललो. त्यांचे मित्रत्व नवीन नाही, जुनेच आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हापासून त्यांचे सख्य आहे. विमानातील फोटो मी दाखवला. या फोटोत मोदी जी त्यांच्या मित्रासोबत आरामात बसले होते. हाच प्रश्न मी उपस्थित केला. परंतु, माझ्या प्रश्नाला सभागृहाच्या कामकाजातून हटवण्यात आले. याबाबत मी लोकसभा अध्यक्षांना मुद्देनिहाय पत्र लिहले. नियमांमध्ये बदल करून विमानतळ अदानींना देण्यात आले. ज्या निमयांमध्ये बदल करण्यात आला होता. त्याची प्रत मी दिली. परंतु, काही फरक पडला नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

सभागृहात मंत्र्यांनी माझ्याबद्दल खोटी वक्तव्य केली. मी विदेशी शक्तींकडून मदत मागितल्याचे खोट पसरवण्यात आल. परंतु, मी असे कुठलेही वक्तव्य केले नाही. संसद नियमानुसार एखाद्या सदस्यावर आरोप लावण्यात आले असतील. तर संबंधित सदस्याला उत्तर देण्याचा अधिकार आहे. यासंदर्भात मी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहले, परंतु, त्याचे उत्तर मिळाले नाही.

दुसरे पत्र लिहीले, त्याचेही उत्तर त्यांनी दिले आहे. थेट लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात जावून त्यांची भेट घेत आपल्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांकडे त्यांचे लक्ष वेधले. असे असतानाही मला सभागृहात का बोलू दिले जात नाही? असा सवाल मी विचारला असता त्यांनी स्मितहस्य करीत मी असे करू शकत नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर काय झाले, हे सर्वांनीच बघितल्याचे राहुल गांधी म्हणाले.

सर्व समाजाला एकमेकांसोबत चालावे लागेल, हे भारत जोडो यात्रेसह सर्वत्र बोललो आहे. द्वेष, हिंसेला स्थान नसावे. हा ओबीसीचा मुद्दा नाही. नरेंद्र मोदी आणि अदानीचा मित्रत्वाचा मुद्दा आहे. परंतु, भाजप लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. कधी ओबीसींचा मुद्दा तर कधी विदेशातील मुद्दा समोर करते. भाजपचे हेच काम आहे. परंतु, ती तीन अब्ज डॉलरचा प्रश्न उपस्थित करणे बंद करणार नाही.

हेही वाचा 

Back to top button