गोधरा अग्निकांड: सर्वोच्च न्यायालयात २४ मार्चला सुनावणी | पुढारी

गोधरा अग्निकांड: सर्वोच्च न्यायालयात २४ मार्चला सुनावणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: देशासह गुजरात हादरून सोडणाऱ्या गोधरा ट्रेन अग्निकांडातील दोषींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे. पुढील आठवड्यात २४ मार्चला गुजरात सरकारची याचिका तसेच २००२ च्या गोधरा अग्निकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोषींच्या जामीन याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड, न्यायमूर्ती नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने गुजरात सरकारचे वकील आणि दोषींना एक प्रत उपलब्ध करवून देण्याचे निर्देश दिले आहेत. दोषींना किती वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती, आतापर्यंत किती काळ त्यांनी तुरूंगावास भोगला आहे, याची माहिती न्यायालयाने मागवून घेतली आहे.

राज्य सरकारने २० फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात ११ दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या सर्व दोषींची शिक्षा गुजरात उच्च न्यायालयाने जन्मठेपेत बदलली होती. हे एक दुर्मिळ प्रकरण आहे. अग्निकांडात रेल्वेचा डब्बा बाहेरून बंद करण्यात आला होता. यात महिला आणि मुलांसह ५९ लोकांना जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेनंतर राज्यात दंगली उसळल्या होत्या, असा युक्तिवाद सरकारच्या वतीने सॉलिसटर जनरल तुषार मेहता यांनी केला होता.

हेही वाचा 

Back to top button