

IMD forecasts : गेल्या २४ तासांत राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट झाली आहे. आता गंभीर हवामानाची तीव्रता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. पुढील २ दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत हलक्या ते गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे.
उमराळे (जि. नाशिक), आवई, पूर्णा (परभणी), नंदूरबार आणि धुळे आणि राज्यातील अंतर्गत भागांत गारपीट झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) वर्तविलेल्या अंदाजानुसार, शनिवारी पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी आणि बीड आदी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि प्रति तास ३० किमी ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये शनिवारी गारपीट होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी IMD ने महाराष्ट्रासाठी वर्तवलेल्या तापमानाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. मात्र त्यानंतर तापमानात तीन ते पाच अंशांची वाढ होईल. विदर्भात पुढील ४८ तासांत कमाल तापमानात दोन ते चार अंशांनी घट होण्याची शक्यता असून त्यानंतर कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही.
दरम्यान, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये २० मार्च पर्यंत गडगडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील तीन दिवसांत उत्तर-पश्चिम भारत, पूर्व भारत, मध्य आणि पश्चिम भारतातील तापमानात २-४ अंश सेल्सिअसने घट होईल, असा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. (IMD forecasts0
हे ही वाचा :