ऑनलाईन डेस्क : देशभरात हृदयविकाराने साथीचे रुप धारण केले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR ) या संस्थेच्या एका रिपोर्टनुसार, देशातील एकूण मृत्यूपैकी २८ टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळे होत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. कॅन्सर आणि डायबिटीजपेक्षाही देशात हृदयविकारामुळे अधिक मृत्यू होत असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरावेळी 'आयसीएमआर'ने भारत: हेल्थ ऑफ द नेशन्स स्टेट्स नावाने एक अहवालातील माहिती दिली आहे. या अहवालात म्हटले आहे की, "२०१६ मध्ये देशात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी २८.१ टक्के मृत्यू हृदयविकारामुळे झाले आहेत. १९९० मध्ये हा आकडा १५.२ टक्के होता. कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण ८.३ टक्के आहे तर १०.९ टक्के मृत्यू श्वसन रोगांमुळे झाले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, २.२ टक्के मृत्यू पचनाच्या आजारांमुळे आणि २.१ टक्के मानसिक आजारांमुळे झाले आहेत. ६.५ टक्के मृत्यू हे मधुमेह, रक्ताशी संबंधित आजारांमुळे झाले आहेत." ( ICMR )
१९९० मध्ये देशात संसर्गजन्य रोग, माता रोग, नवजात रोग आणि कुपोषण-संबंधित रोगांमुळे देशात ५३.६ टक्के टक्के मृत्यू झाले होते. त्याचवेळी ८.५ टक्के लोकांचा मृत्यू दुखापतीमुळे झाला. २०१६ मध्ये संसर्गजन्य रोग, माता आणि नवजात शिशु रोग आणि कुपोषण-संबंधित रोगांमुळे मृत्यूची संख्या २७. ५ टक्क्यांवर आली. तर दुखापतींमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १०.७ टक्के आणि इतर आजारांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ६१.८ आहे.
हेही वाचा :