देशभरात तीव्र ताप, खोकल्याची साथ, H3N2 विषाणूचा संसर्ग घातक, ICMR कडून सावधानतेचा इशारा

देशभरात तीव्र ताप, खोकल्याची साथ, H3N2 विषाणूचा संसर्ग घातक, ICMR कडून सावधानतेचा इशारा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सध्या देशात तीव्र ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. याला इन्फ्लूएंझा (फ्लू) विषाणूंचा एक उपप्रकार Influenza A subtype H3N2 कारणीभूत आहे, अशी पुष्टी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) केली आहे. H3N2 संसर्गामुळे इतर इन्फ्लूएंझा उपप्रकारांपेक्षा रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक असते, असे आयसीएमआरने म्हटले आहे. याबाबतचे वृत्त द टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

Influenza A subtype H3N2 हा एक विषाणूचा उपप्रकार आहे ज्यामुळे इन्फ्लूएंझा होतो. H3N2 विषाणू पक्षी आणि प्राण्यांना संक्रमित करू शकतो. पक्षी, मानव आणि डुकरांमध्ये या विषाणूचे अनेक स्ट्रेन्समध्ये म्युटेशन झाले आहे. H3N2 चा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढते.

ICMR देशभरातील व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज (VRDLs) च्या नेटवर्कद्वारे श्वसनमार्गे पसरणाऱ्या विषाणूंच्या आजारांवर सतत देखरेख ठेवते. ICMR च्या महामारीविज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. निवेदिता गुप्ता यांनी सांगितले की, 30 VRDLS डेटामधून १५ डिसेंबरपासून आतापर्यंत इन्फ्लूएंझा A H3N2 च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. "रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांपैकी निम्म्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाचे श्वसन संक्रमण (SARI) आणि बाह्यरुग्णांमध्ये इन्फ्लूएंझा A H3N2 चा संसर्ग दिसून आला आहे."

तापमान वाढू लागल्यानंतर मार्चअखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून या विषाणूच्या उपप्रकारामुळे होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असल्याचे डॉ. गुप्ता यांनी म्हटले आहे. ICMR च्या मते, H3N2 ची लागण झालेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्या ९२ टक्के रुग्णांना ताप, ८६ टक्के रुग्णांना खोकला, २७ टक्के रुग्णांना श्वसनाचा त्रास, १६ टक्के रुग्णांना घसादुखी असल्याचे आढळून आले आहे. याव्यतिरिक्त आयसीएमआरच्या निरीक्षणात असेही आढळून आले की अशा १६ टक्के रुग्णांना न्यूमोनिया आणि ६ टक्के रुग्णांना फीटचा त्रास झाला आहे.

रुग्णांना ऑक्सिजनची गरज

"H3N2 मुळे तीव्र श्वसन संक्रमण झालेल्या सुमारे १० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि ७ टक्के रुग्णांना ICU मध्ये दाखल करण्याची गरज भासते," असे ICMRने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगभरात दरवर्षी इन्फ्लूएंझा विषाणूंमुळे सुमारे ३० लाख ते ३० लाख गंभीर आजाराची प्रकरणे आणि २.९ लाख ते ६.५ लाख मृत्यू श्वसनाशी संबंधित आजारामुळे होतात.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news