

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानने भारताविरोधात आगळीक केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भारत सडेतोड प्रत्युत्तर देण्याची शक्यता अधिक आहे. तसेच भारताचे पाकिस्तान आणि यांच्यासोबत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या ( US intelligence Report ) अहवालात देण्यात आली आहे. हा अहवाल नुकताच अमेरिकेच्या संसदेत सादर करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे की, पाकिस्तानने भारताची कुरापत काढली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भारत पाकिस्तानला लष्करी बळाने सडेतोड प्रत्युत्तर देण्याची शक्यता अधिक आहे. सध्या भारत आणि चीन सीमा प्रश्नाच्या चर्चेत गुंतले आहेत. २०२० मध्ये भारत आणि चीन सैनिकांमध्ये सीमेवर झालेली चकमक ही मागील दशकातील सर्वात गंभीर बाब आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
भारत आणि चीन या दोन्ही देशांनी आपल्या सीमेवरील लष्करी ताकद वाढली आहे. त्यामुळे दोन्ही अणुशक्ती असणार्या देशांमधील संघर्ष धोका वाढत आहे. अशावेळी अमेरिकेच्या हस्तक्षेपाची मागणी होवू शकते, अशीही अपेक्षा या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे विशेष चिंतेची बाब आहे. सध्या तरी दोन्ही देशात युद्धविराम आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र भारताविरोधात नेहमीच दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे. मात्र या वेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तानच्या चिथावणीला लष्करी सामर्थ्याने सडेतोड प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष वाढण्याचा धोका आहे, असेही या अहवाालात स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, पाकिस्तानमधील दशतवाद विरोधी कारवायांना तोंड देण्यासाठी अमेरिकेची पाकिस्तानसोबत काम करण्याची इच्छा आहे. प्रादेशिक सुरक्षा अबाधित ठेवण्यातच सर्वांचे हित आहे. दक्षिण आणि मध्य आशियात पाकिस्तान आणि अमेरिका सर्व दहशतवादी संघटनांचा मुकाबला करण्यासाठी एकत्रितपणे पावले उचलण्यासाठी चर्चा करु शकतात. जागतिक स्थिरता व शांततेला धोका निर्माण करणार्या घटना आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे, असेही प्राइस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :