आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून नारीशक्तीला नमन | पुढारी

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून नारीशक्तीला नमन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर आणि महत्त्वाची भूमिका बजावत असून त्या अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित करीत आहेत. महिला जागृत असून अनेक क्षेत्रात नेतृत्वाची पदे भूषवत आहेत, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिलांच्या संकल्पना, विचार आणि मूल्ये यामुळे सुखी कुटुंब, आदर्श समाज आणि समृद्ध राष्ट्र निर्माण होऊ शकते. स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी अजूनही प्रयत्नांची गरज आहे. मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी राष्ट्र कटिबद्ध आहे. शिक्षणामुळे त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव होईल. आपल्या मुली केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अभिमान आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उत्सवासाठी आणि देशातील महिलांना आनंदी भविष्यासाठी मी शुभेच्छा देते, अशा शब्दात राष्ट्रपतींनी भावना व्यक्त केल्या.

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम : पंतप्रधान

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, आपल्या नारी शक्तीच्या कर्तृत्वाला सलाम. भारताच्या प्रगतीतील महिलांच्या योगदानाची आम्ही प्रशंसा करतो. आमचे सरकार महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच कार्यरत राहील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारीशक्तीच्या उपलब्धींना नमन केले. पंतप्रधानांनी मन की बातमध्ये ज्या महिलांच्या जीवनप्रवासाचा उल्लेख केला होता त्यांचे संकलन देखील मोदी यांनी ट्विटर वरून शेअर केले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button