RJD MP Misa Bharti : लालू यादव यांच्या चौकशीसाठी भारती यांच्या निवासस्थानी सीबीआयची धडक | पुढारी

RJD MP Misa Bharti : लालू यादव यांच्या चौकशीसाठी भारती यांच्या निवासस्थानी सीबीआयची धडक

पुढारी ऑनलाइन डेस्क : लँड फॉर जॉब्ज घोटाळा प्रकरणी RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या चौकशीसाठी RJD खासदार मीसा भारती यांच्या निवासस्थानी सीबीआयचे एक पथक दाखल झाले आहे. जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी, असे हे प्रकरण आहे. एएनआयने याचे सविस्तर वृत्त दिले आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीत, “काही दिवसांपूर्वी सीबीआयने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांना जमिनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये नोकरी देण्याच्या (लँड फॉर जॉब्ज) घोटाळा प्रकरणी नोटीस बजावली होती. सीबीआय लवकरच लालू यादव यांची चौकशी करेल,” असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सोमवारी एएनआयला सांगितले. याआधी सोमवारी सीबीआय कथित प्रकरणात बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पाटणा येथील निवासस्थानी पोहोचली. तर आज मंगळवारी त्यांची मुलगी मीसा भारती हिच्या पंडारा पारक या निवासस्थानी ही चौकशी सुरू आहे. मीसा भारती या राज्यसभा सदस्य आहेत. तपासात सहकार्य करणार असल्याचे लालू यादव यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

सीबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, राबडी देवी, त्यांची मुलगी मिसा भारती आणि इतर १३ जणांविरुद्ध जमीन-नोकरी घोटाळ्यात आरोपपत्र दाखल केले होते.

आरोपपत्रात म्हटले आहे की, तपासादरम्यान असे आढळून आले की, तत्कालीन जीएम सेंट्रल रेल्वे आणि सीपीओ, सेंट्रल रेल्वे यांच्यासमवेत कट रचून आरोपींनी त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावावर जमिनीच्या बदल्यात व्यक्तींना नियुक्त केले.

ही जमीन प्रचलित सर्कल दरापेक्षा कमी आणि बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीत संपादित करण्यात आली होती. उमेदवारांनी खोट्या टीसीचा वापर केला आणि खोटी साक्षांकित कागदपत्रे रेल्वे मंत्रालयाला सादर केल्याचा आरोपही सीबीआयने केला आहे.
लालू यादव रेल्वेमंत्री असताना 2004 ते 2009 दरम्यान कथित घोटाळा झाला होता. आरोपपत्रात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुखांव्यतिरिक्त तत्कालीन रेल्वे महाव्यवस्थापकांच्या नावाचाही समावेश आहे.

तर आपण कोणाला सोडणार नाही…

दरम्यान लालू यादव यांचा छळ केला जात असून त्यांना काही झाले तर आपण कोणालाही सोडणार नाही, असे वक्तव्य लालू यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. आचार्य यांनी काही महिन्यांपूर्वी आपली एक किडनी लालू यादव यांना दान केली होती. आपले 74 वर्षीय वडील दिल्लीचे सत्तास्थान हादरविण्यास अजूनही सक्षम आहेत, असेही आचार्य यांनी म्हटले आहे.

लालू आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या नव्याने सुरु झालेल्या सीबीआय चौकशीवर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला राष्ट्रीय जनता दल प्रखर विरोध करत असल्यानेच यादव कुटुंबाच्या मागे चौकशी लावण्यात आली असल्याचा आरोप लालू यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला आहे.

Philippines earthquake | फिलीपिन्स भूकंपाने हादरले, रिश्टर स्केलवर ६.० तीव्रता, नुकसानीची भिती

PM Modi on Budget Webinar : जगात RuPay आणि UPI ही भारताची ओळख, PM मोदींचे इंडिया इंकला गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन

Back to top button