

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लंडन दौऱ्यावर गेलेले काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला आहे. मोदी स्वतः भारताचा अपमान करतात. त्य़ांनी माझ्या आजी- आजोबांचाही अपमान केला आहे. केंब्रिज येथील व्याख्यानमालेत आपण काहीही चुकीचे बोललो नाही, असे स्पष्ट करत भाजपला तोडून फोडून गोष्टी सांगणे आवडते, अशीही टीका राहुल गांधी यांनी केली.
भारताची बदनामी केल्याचा आरोप राहुल गांधी यांच्यावर भाजपने केला आहे. या आरोपांना लंडनमधील इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी स्वत: म्हटले आहे की, गेल्या ६०-७० वर्षांत काहीही केले नाही. असे म्हणून मोदी यांनी प्रत्येक भारतीय आणि त्यांच्या आजी-आजोबांचा अपमान केला आहे. भारताने एक दशक गमावले आहे, हे सर्व त्यांनी परदेशात सांगितले आहे, असेही गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करताना सांगितले की, भारतातील सर्वसंस्था भाजपच्या ताब्यात आहेत. माझा फोन टॅपिंग केले जात आहे. भारतात मीडिया आणि न्यायव्यवस्था नियंत्रणात आहे. माझ्या फोन रेकॉर्डवर पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे. तुमचा फोन रेकॉर्ड होत असल्याची माहिती मला गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिल्याचे गांधी यांनी सांगितले. माझ्यावर फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.
यावेळी राहुल गांधी यांना विचारण्यात आले की, तुम्ही पुढील भारताचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार का ? यावर ते म्हणाले की, यावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आता केवळ भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे.
हेही वाचा :