Karnataka :  भाजप आमदाराच्या मुलाला लाच घेताना रंगेहाथ पकडले; घरातून ६ कोटी रुपये जप्त | पुढारी

Karnataka :  भाजप आमदाराच्या मुलाला लाच घेताना रंगेहाथ पकडले; घरातून ६ कोटी रुपये जप्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील भाजप आमदाराच्या मुलाला लाच घेताना लोकायुक्तांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याचबरोबर घरातून ६ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. प्रशांत मदल असे त्याचे नाव असून तो चेन्नाईगिरीचे भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा आहे. मदल विरुपक्षप्पा हा सरकारी मालकीच्या कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेडचे (KSDL) अध्यक्ष आहेत. केएसडीएल हे प्रसिद्ध म्हैसूर सँडल साबण तयार करते. तर त्यांचा मुलगा प्रशांत बंगळुरू पाणी पुरवठा आणि सीवरेज बोर्ड (BWSSB) मध्ये मुख्य लेखापाल आहे.  (Karnataka) वाचा सविस्तर बातमी.

Karnataka : ४० लाखांची लाच

लोकायुक्त अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.३) भाजप आमदार एम. विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत याला ४० लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. ही कारवाई आज (दि.३) पहाटे चार वाजेपर्यंत सुरु होती. लोकायुक्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कुमारला त्याच्या वडिलांच्या बेंगळुरू येथील कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड (KSDL) कार्यालयातून अटक करण्यात आली आहे, जिथे तो लाच स्वीकारत होता. लोकायुक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकात साबण आणि डिटर्जंटच्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासंदर्भातील टेंडरसाठी ८० लाखांची मागणी प्रशांतने केली होती.

८० लाख रुपयांची मागणी केली होती

प्रशांतकडून तीन पोती रोकड जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशांतवर लाच प्रकरणी एकाने तक्रार केली होती. तक्रारीनुसार  त्याने ८० लाख रुपयांची मागणी केली होती. ही तक्रार ठेकेदाराने आठवड्यापूर्वी लोकायुक्तांकडे केली होती. तक्रारीनंतर प्रशांतला रंगेहाथ पकडण्याची योजना आखण्यात आली. त्यानंतर त्याला ४० लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली आहे. यात सहा कोटी जप्त करण्यात आले आहेत. यासंदर्भात मदल विरुपक्षप्पा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, याबाबत मला काहीही माहिती नाही, माध्यमात वृत आल्यानंतर हे प्रकरण समजले.

पोलिस आणि लोकायुक्त अधिकाऱ्यांनी प्रशांत यांच्या काही नातेवाईक आणि अकाउंटंट यांनाही अटक केली आहे. यापूर्वीही प्रशांतवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.

हेही वाचा 

Back to top button