पर्यटन विकासासाठी ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार अन् ‘दीर्घकालीन नियोजन’ महत्त्वाचे -पीएम मोदी | पुढारी

पर्यटन विकासासाठी 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार अन् 'दीर्घकालीन नियोजन' महत्त्वाचे -पीएम मोदी

पुढारी ऑनलाईन: आज भारत नवीन नवीन कार्यसंस्कृती घेऊन पुढे जात आहे. भारतात टुरिझम सेक्टरला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आऊट ऑफ द बॉक्स विचार करण्याची आणि दीर्घकालीन नियोजन करून मार्गक्रमण करणे महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच जेव्हा जेव्हा पर्यटन स्थळ विकसित करण्याचा विचार येतो तेव्हा जागेची क्षमता, सुलभ प्रवासासाठी पायाभूत सुविधांची गरज आणि ती कशी पूर्ण करणार आणि तिसरी गोष्ट प्रमोशनसाठी नवीन काय करणार? हे तीन प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. पोस्ट बजेट वेबिनार दरम्यान पर्यटन विकासावर ते बोलत होते.

भारतातील तीर्थयात्रांनी एकात्मता वाढवली

भारताच्या दृष्टीने पर्यटनाची व्याप्ती महत्त्वाची आहे. शतकानुशतके येथे यात्रा होत आहेत, तो आपल्या सांस्कृतिक-सामाजिक जीवनाचा एक भागच आहे. जेव्हा कोणत्याही प्रकरच्या सोई सुविधा नव्हत्या तेव्हा देखील लोक अनेक दुःख सहन करूनही तीर्थयात्रेला जात असत. चार धाम यात्रा, द्वादश ज्योतिर्लिंग यात्रा, ५१ शक्तीपीठ यात्रा, अशा अनेक यात्रा आपल्या श्रद्धास्थानांना जोडत असत. येथे होत असलेल्या यात्रांनी देशाची एकात्मता अधिक दृढ करण्याचे काम केले आहे. भारतात या यात्रांची परंपरा असून देखील याठिकाणच्या सोई सुविधा वाढवण्याकडे लक्ष दिले गेले नाही, ही दुर्दैवी बाब आहे.

सोई सुविधा वाढल्यास पर्यटकांची संख्या वाढते

पहिल्या शेकडो वर्षांची गुलामगिरी आणि स्वातंत्र्यानंतरच्या दशकांमध्ये या ठिकाणांची राजकीय उपेक्षा यामुळे देशाचे खूप नुकसान झाले आहे. परंतु आजचा भारत ही परिस्थिती बदलत आहे. भारतातील विविध ठिकाणी नागरी सुविधा, डिजिटल कनेक्टिव्हिटी, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, स्वच्छता, उत्कृष्ट पायाभूत सुविधा चांगल्या आणि अधिक असतील तर भारताचे पर्यटन क्षेत्र अनेक पटींनी वाढू शकते. जेव्हा प्रवाशांसाठी सुविधा वाढतात, तेव्हा प्रवाशांमध्ये आकर्षण कसे वाढते, त्यांच्या संख्येत मोठी वाढ होते, हे आपण देशातही पाहत आहोत. असेही पीएम मोदी यांनी म्हटले आहे.

गावेही पर्यटनाची केंद्रे

याच काळात आपली गावेही पर्यटनाची केंद्रे बनत आहेत. चांगल्या पायाभूत सुविधांमुळे आता दुर्गम गावे पर्यटनाच्या नकाशावर येत आहेत. केंद्र सरकारने सीमेवर वसलेल्या गावांसाठी ‘व्हायब्रंट बॉर्डर व्हिलेज स्कीम’ही सुरू केली आहे. होम स्टे असो, छोटे हॉटेल असो, छोटेखानी रेस्टॉरंट असो, अशा अनेक व्यवसायांसाठी लोकांना शक्य तितके आधार देण्याचे काम करावे लागणार असल्याचेही मोदी म्हणाले.

पाहा व्हिडिओ:

हेही वाचा:

Back to top button