

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात मागील काही दिवसांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ( live-in relationship) राहणार्या जोडप्यांमधील गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणवर वाढ झाली आहे. त्यामुळे लिव्ह -इन- रिलेशनशिप संबंधाची नोंदणी सक्तीची करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्यांची नोंदणी सक्तीची करण्यात यावी, संबंधांच्या नोंदणीसाठी नियम आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात यावी, अशीही मागणी करणारी याचिका वकील ममता राणी यांनी दाखल केली आहे. अशा नातेसंबंधांच्या नोंदणीसाठी नियम तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला द्यावेत, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
याचिकेत म्हटले आहे की, लिव्ह इन रिलेशनशिप राहणार्या जोडीदारांना संरक्षण देणारे अनेक निवाडे न्यायालयाने दिले आहेत. अशा नात्यामधील महिला, पुरुष किंवा जन्माला आलेल्या मुलांनाही न्यायालयाने संरक्षण दिले आहे. मात्र अशा संबंधांसाठी कोणतेही नियम व मार्गदर्शक तत्वे नाहीत. त्यामुळे अशा नातेसंबंधात राहणार्या महिलांवर बलात्कार आणि खून झाल्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या याचिकेत श्रद्धा वालकर निर्घृण खूनाचाही उल्लेख करण्यात आला आहे.
सरकारने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची नोंदणी सक्तीची केली. तसेच अशा संबंधांच्या नोंदणीसाठी नियम आणि मार्गदर्शक तत्वे तयार केली तर संबंधितांच्या वैवाहिक स्थिती, गुन्हेगारी इतिहास आणि अन्य तपशीलांची सरकारला माहिती उपलब्ध होईल, असेही या याचिकेत म्हटले आहे.
हेही वाचा :