पुढारी ऑनलाईन : दिल्ली एमसीडीमध्ये स्थायी समितीच्या सदस्य निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आपचे बवाना प्रभागाचे नगरसेवक पवन सेहरावत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी दिल्ली एमसीडीमध्ये बराच गदारोळ आणि मारामारी झाली होती, त्यानंतर स्थायी समितीची निवडणूक होऊ शकली नाही.
निवडणुकीसाठी सभागृहाचे कामकाज आज (दि.२४) सकाळी १० वाजता सुरू होणार होते, तत्पूर्वीच पवन सेहरावत यांनी आप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या आप नगरसेवकाने आम आदमी पक्षातील भ्रष्टाचारामुळे पक्ष सोडल्याचे सांगितले आहे.
आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये दाखल झालेले नगरसेवक पवन सेहरावत यांनी मोठा आरोप केला आहे. आम आदमी पार्टी सभागृहात गोंधळ घालण्यासाठी दबाव आणत असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर नगरसेवकांना सभागृहात गोंधळ घालण्यास सांगितले होते. त्यांच्या सांगण्यावरून गदारोळ माजवला, त्यामुळे मी पक्ष सोडून भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. काल सभागृहात जे घडले ते दुर्दैवी असल्याचे ते यावेळी म्हणाले.