SAP Labs ने भारतातील ३०० कर्मचाऱ्यांना काढले, ‘हे’ आहे कारण

SAP Labs ने भारतातील ३०० कर्मचाऱ्यांना काढले, ‘हे’ आहे कारण

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : SAP Labs ह्या जर्मन तंत्रज्ञान कंपनीच्या SAP संशोधन आणि विकास व्यवसाय युनिटने गेल्या आठवड्यात भारतातील सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या नोकरकपातीचा फटका बंगळूर आणि गुडगाव येथील SAP कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बसला आहे. याबाबतचे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. ज्या कर्मचार्‍यांना नोकरीवरुन कमी केले आहे त्यातील काहींना १० ते १५ वर्षांचा कामाचा अनुभव आहे. त्यांनी कंपनीत किती वर्षे सेवा दिली या हिशोबाने इतर फायद्यांसह त्यांना सॅलरी पॅकेजचा मोबदला दिला असल्याचे समजते. दरम्यान, या नोकरकपातीवर अधिक सांगण्यास SAP ने नकार दिला.

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, "हा एक कठीण निर्णय होता आणि आम्हाला या बदलांच्या वैयक्तिक परिणामाची पूर्णपणे जाणीव आहे." दरम्यान, एका सूत्राने सांगितले की ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे त्यांच्याकडील काही कौशल्ये कालबाह्य झाली आहेत आणि बहुतांश ग्राहक क्लाउडकडे वळत आहेत. त्यासाठी नवीन कौशल्ये आत्मसात असलेल्या कर्मचाऱ्यांची कंपनीला गरज आहे.

SAP ने गेल्या महिन्याच्या अखेरीस जागतिक स्तरावर त्याच्या मुळ व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरकपातीची घोषणा केली होती. कंपनीने ३ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याचे म्हटले होते. डिसेंबर २०२२ ला संपलेल्या चौथ्या तिमाहीत या फर्मने क्लाउड बिझनेसमध्ये ३० टक्के महसूल वाढ नोंदवली होती. असे असतानाही लगेचच कंपनीने नोकरकपातीची घोषणा केली.

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला, SAP लॅब्सने सांगितले होते की ते २०२५ पर्यंत भारतातील कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट केली जाईल. तसेच देवनहळ्ळी, बंगळूर येथे १५ हजार लोकांची क्षमता असलेला नवीन कॅम्पस सुरु करेल. कंपनीने त्यासाठी ४१ एकर जागा घेतली आहे.
SAP लॅब्सने याआधी सांगितले की त्यांच्याकडे बंगळूर, पुणे, मुंबई, गुडगाव आणि हैदराबाद या पाच ठिकाणी १४ हजार कर्मचारी काम करतात. SAP Labs India मधील कर्मचारी संख्या आता १९ हजारांवर गेली आहे. "आमच्याकडे नोटीस कालावधीचे दोन महिने आहेत आणि तोपर्यंत आम्ही नोकऱ्या शोधू," असे एका प्रभावित कर्मचाऱ्याने द इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना सांगितले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news