Maharashtra Political Crisis | ३९ आमदार पक्ष हायजॅक करू शकत नाहीत, त्यांना राज्यपालांनी शपथ कशी दिली?, सिब्बल यांचा युक्तिवाद

Maharashtra Political Crisis | ३९ आमदार पक्ष हायजॅक करू शकत नाहीत, त्यांना राज्यपालांनी शपथ कशी दिली?, सिब्बल यांचा युक्तिवाद

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : सत्तासंघर्षावरील (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयातील सलग सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशीही ठाकरे गटाची बाजू मांडताना अॅड. कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी आज बहुमत चाचणीबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालावर आक्षेप घेतला. त्यांनी यावेळी जूनमधील न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख केला. पुरेसा वेळ न दिल्याने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, असा महत्वाचा मुद्दा सिब्बल यांनी उपस्थित केला. तसेच अध्यक्षांच्या अधिकारांवरही युक्तिवाद झाला. ३९ आमदार पक्षाला हायजॅक करू शकत नाहीत. ३९ सदस्यांना शिवसेनेचे म्हणू शकत नाही. त्यांचा कोणताही पक्ष नसताना राज्यपालांनी त्यांना शपथ कशी दिली. हा मुद्दा महत्वाचा असल्याचे सिब्बल यांनी नमूद केले.

प्रत्येक घटनात्मक संस्थेने हे सुनिश्चित केले पाहिजे की निवडून आलेले सरकार सत्तेत राहते. मंत्रिपदाची शपथ द्यायची की नाही हे राज्यपालांनी ठरवायचे असते. समजा ३० लोक त्याच्याकडे गेले. ते कोणत्या पक्षाचे आहेत हे राज्यपालांना कळायला हवे होते. त्यांची युती ही निवडणुकीआधीची की निवडणुकीनंतरची आहे हे राज्यपालांनी विचारायला हवे होते. ३९ सदस्य शिवसेनेचे नसताना राज्यपालांनी त्यांना शपथ घेण्याचा निर्णय कसा घेतला? असा सवालही सिब्बल यांनी उपस्थित केला.

तुम्ही ४५ अथवा ४०… तुम्ही स्वतःच चीफ व्हिप नेमला. हे बेकायदेशीर आहे. विधिमंडळाचे सदस्य असा ठराव मंजूर करू शकत नाहीत. ते व्हिपचा अवमान करू शकत नाहीत आणि व्हिप काढू शकत नाहीत. तुम्ही राजकीय पक्षाची अखंडता जपायला हवी होती, असा दावा सिब्बल यांनी केला. नव्या अध्यक्षांची नेमणूक अवैध असल्याचा दावाही त्यांनी केला. न्यायालयाने २०२२ मध्ये दिलेल्या दोन निर्णयामुळे पेच निर्माण झाल्याचे सिब्बल यांनी म्हटले.

शिंदेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

शिंदे यांना कोणत्या आधारावर राज्यपालांनी त्यांना पदाची शपथ दिली? ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. असे असताना शिंदे यांना त्याचा अधिकार कुठून आला?. राज्यघटनेनुसार पक्षात फूट पडल्यास पक्षाची बैठक घ्यावी लागते आणि बहुमत कोणाचे आहे हे त्यांनी ठरवायचे असते. त्यावेळी तर आमदार आसाम होते. यामुळे येथे २१ जूनपूर्वी पक्षाची बैठक झालीच नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

कालच्या सुनावणीत काय झालं?

आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दयावर सर्वप्रथम निर्णय घेतला जाणे गरजेचे असल्याचे सांगतानाच संपूर्ण प्रकरणातील राज्यपालांच्या भूमिकेवर सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राज्यातील सत्तासंघर्षाला अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरण लागू होते का, याची पडताळणी मूळ खटल्याच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालय करणार आहे. कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान शिंदे गटाची पक्षविरोधी कृती, विधानसभा अध्यक्षांची निवड, तीन अपक्ष आमदारांचे निलंबन, राज्यपालांची भूमिका आदी विषयांवर ऊहापोह केला आहे. घटनेच्या दहाव्या सूचीचा हवाला देत पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसारविलीनीकरण हाच शिंदे गटासमोरील पर्याय असल्याचा दावा सिब्बल यांनी केला. (Maharashtra Political Crisis)

हेतू कळाल्याने ठाकरेंचा राजीनामा

सिब्बल यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल प्रश्न उपस्थित करताना एखाद्या सदस्यावर निलंबनाची कारवाई प्रलंबित असताना राज्यपाल त्याला मुख्यमंत्रिपदाची शपथ कसे देऊ शकतात, असा महत्त्वाचा मुद्दा सिब्बल यांनी मांडला आहे. याच राज्यपालांनी पहाटे शपथ दिली होती, त्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राजीनामा द्यावा लागला होता, असेही ते म्हणाले. बहुमत न पाहता राज्यपालांनी शपथविधी कसा काय उरकला ? राज्यपालांचा पुढचा हेतू माहीत असल्याने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

पक्षांतरबंदी कायदा पक्षफुटीबाबत

उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे नेते असल्याने एकनाथ शिंदे यांना विधानसभेचा नेता म्हणून निवडण्यात आले होते. त्यानंतर पक्षाने त्यांना काढून टाकले, असे सांगतानाच पक्षांतरबंदी कायद्यात विधिमंडळ पक्षातील फुटीबद्दल तरतुदी नसून राजकीय पक्षातील फुटीबद्दल तरतुदी आहेत, असे सिब्बल यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालय अपात्र ठरवू शकते

युक्तिवादादरम्यान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सिब्बल यांना सर्वोच्च न्यायालय आमदारांना अपात्र ठरवू शकते काय, असा सवाल केला. यावर सिब्बल यांनी होकारार्थी उत्तर देत सर्वोच्च न्यायालयाने राणा प्रकरणात अशा प्रकारे आमदारांना अपात्र ठरविल्याची माहिती दिली. सुनावणीदरम्यान अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार असण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी सिब्बल यांनी पक्षात फूट पडल्याचे सांगत आमदारांना दहाव्या सूचीतील तरतूद मोडीत काढता येणार नाही, असे मत व्यक्त केले.

अपात्रतेचा प्रस्ताव आधीचाच

सिब्बल पुढे म्हणाले की, राज्यपालांच्या हेतूबद्दल शंका यावी, अशा पद्धतीने काही निर्णय घेतले गेले, त्यातून बहुमत चाचणीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आसामला गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय झाला असता तर अध्यक्ष निवडीचा निकाल देखील वेगळाच लागला असता. स्वतःला हे आमदार जर शिवसेनेचे घटक मानत होते तर त्यांनी पक्षाचा व्हिप का डावलला? ठाकरे गटाने आधी १३ आमदारांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्षांकडे पाठविला होता. तथापि सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता, हेही घटनापीठाने लक्षात घेतले पाहिजे.

झिरवळांना न्यायालयाने रोखले

नाम रेबिया प्रकरणाचा खटला आपण स्वतः लढविला होता. तेथे न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर पडलेले सरकार पुन्हा सत्तेत आले होते, असे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अपात्रतेच्या मुद्दयावर उपाध्यक्ष झिरवळ यांना न्यायालयाने रोखले होते. न्यायालयाने रोखले नसते तर त्यांनी आवश्यक तो निर्णय घेतला असता, असे सिब्बल म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी तीन राज्यांची मदत घेतली. राज्याबाहेर झालेल्या बैठका पक्षाच्या नव्हत्या, त्यामुळे त्या अधिकृत मानता येणार नाहीत, असेही ते म्हणाले.

१८ ला बैठक आणि १९ तारखेला याचिका

पक्षाचा नेता म्हणवून घेतल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी १८ जुलै २०२२ पर्यंत एकही बैठक बोलावली नव्हती. १८ तारखेला त्यांनी पहिली बैठक बोलावली आणि १९ जुलै २०२२ ला पक्षचिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली, असेही सिब्बल यांनी निदर्शनाला आणून दिले.

व्हिप न जुमानता भाजपला मतदान

३ जुलै २०२२ रोजी पक्षातच असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार करीत होते. पण तरीही प्रतोद सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हिपला न जुमानता त्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले. शिंदे गटाचे तसेच काही अपक्ष आमदार देखील अपात्र ठरले असते तर अध्यक्ष निवडणुकीत बहुमताचा आकडा १२४ झाला असता आणि राहुल नार्वेकर यांना १२२ मते पडली असती. थोडक्यात, अध्यक्षपदी नार्वेकर निवडून आले नसते, असा मुद्दा सिब्बल यांनी मांडला. सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर प्रतिप्रश्न केल्यानंतर सिब्बल यांनी व्हिप विधान भवनाच्या बाहेर जारी होतो आणि त्याची अंमलबजावणी सभागृहात होते, असे सांगितले.

सिब्बल म्हणाले की, या प्रकरणात न्यायालयाचा निकाल प्रतिकूल आला तर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. दहाव्या सूचीतील कोणत्या तरतुदीनुसार हे ४० आमदार स्वतःचा बचाव करू शकणार, हाही मोठा प्रश्न आहे.

सिब्बल यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न?

  • विधिमंडळ पक्षातील सदस्य पक्षात फूट पडल्याचे सांगून घटनेच्या दहाव्या सूचीतील नियम मोडीत काढू शकतात का? एक तृतीयांश बहुमत असलेले लोकप्रतिनिधी संपूर्ण पक्षावर दावा करू शकतात का?
  • फक्त विधानसभेतील आकडेवारीच्या आधारे पक्षाचे नाव व चिन्ह शिंदे गटाला देत आहोत, असे निवडणूक आयोग सांगते. असे करता येऊ शकते का?
  • गट वेगळा झाल्यानंतर तो आता आम्ही पक्षापासून स्वतंत्र आहोत किंवा अपक्ष आहोत, असे म्हणू शकतो का?
  • ज्या सदस्याच्या विरोधात अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित आहे, अशा सदस्याला राज्यपाल मुख्यमंत्रिपदाची शपथ देऊ शकतात का
    न्यायालय विधानसभा अध्यक्षांना विश्वासात न घेता स्वतः काही निर्णय घेऊ शकते का?
  • जर बेकायदेशीरपणे कार्यवाही करण्यात आली असेल तर त्यावेळी न्यायालयाची नेमकी भूमिका काय?
  • सभागृहाबाहेरचे वर्तन पक्षशिस्तीत येते. त्यामुळे कारवाईचा अधिकार पक्षाचा आहे. शिवाय राज्यपालांनी अधिवेशन बोलावण्याची घाई का केली?
  • गटनेता ठरविण्याचे अधिकार आमदारांना की पक्षाला आहेत? वास्तविक पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार गटनेता व्हिप जारी करू शकतो. आसाममध्ये बसून मुख्य नेत्याची निवड कशी काय झाली?

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news