Thackeray vs Shinde : ‘आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही तर ठाकरे गटाचे सर्व हिसकावून घेतले जाईल­­­’ | पुढारी

Thackeray vs Shinde : 'आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही तर ठाकरे गटाचे सर्व हिसकावून घेतले जाईल­­­'

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली असून या याचिकेवर बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होईल, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी स्पष्ट केले आहे. ( Thackeray vs Shinde )याचिका आम्ही पूर्णपणे वाचलेली नाही. त्यामुळे बुधवारी यावर सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.

Thackeray vs Shinde : सर्व काही हिसकावून घेतले जाईल

ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी याचिका दाखल केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली नाही तर ठाकरे गटाचे सर्व काही हिसकावून घेतले जाईल, असा दावा कपिल सिब्बल यांनी केला. याआधी ठाकरे गटाच्या कार्यालयांचा ताबा घेण्यात आला आहे. जर प्रकरणावर लवकर सुनावणी घेऊन दिलासा दिला नाही तर शिवसेनेचे बँक खाते आणि फंडही जाईल, असे सिब्बल म्हणाले. निवडणूक आयोगाने केवळ काही आमदारांच्या आधारावर निर्णय दिला आहे, असा युक्तिवाद करतानाच जोवर सुनावणी होत नाही अथवा स्थगिती दिली जात नाही, तोवर हे प्रकरण ‘जैसे थे’ ठेवले जावे, अशी विनंती सिब्बल यांनी केली. नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निवडणूक निर्णय ठाकरे गटासाठी अत्यंत धक्कादायक ठरला होता. त्यामुळे बुधवारच्या सुनावणीदरम्यान काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नाव आणि चिन्हाच्या विषयावर ठाकरे गटाने याआधी दोनदा दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तथापि दोन्ही वेळा उच्च न्यायालयाने त्यांना नकार दिला होता. अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालयात या विषयावर सुनावणी घेण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी केला आहे.

शिंदे गटाकडून आधीच कॅव्हेट दाखल ठाकरे गटाच्या याचिकेचे ‘मेन्शनिंग’ करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले होते. त्यानुसार ही याचिका ‘मेन्शन’ झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून आव्हान दिले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन शिंदे गटाने आधीच कॅव्हेट दाखल केलेले आहे.

हेही वाचा

Back to top button