नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने नुकतीच देशातील २० ई-फार्मसींना कारणे दाखवा नोटीस बजावली. औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या तरतुदींचे उल्लंघन करून औषधांची विक्री आणि वितरण केल्याबद्दल कारवाई का केली जाऊ नये असा इशारा DCGI ने ऑनलाईन फार्मसींना नोटिसीमधून दिला आहे. ज्यांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यात Tata1mg, Flipkart Health+ आणि Amazon या कंपन्यांचा समावेश आहे.
DCGI ने नोटिसीमध्ये असे म्हटले आहे की परवान्याशिवाय ऑनलाइन, इंटरनेट अथवा इतर इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मद्वारे औषधांची विक्री, साठा करणे, प्रदर्शन अथवा विक्री तसेच वितरणासाठी ऑफर केल्याने औषधांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि स्वतःहून औषधे घेणे आणि औषधांचा अविवेकी वापर यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होतो.
"वरील बाबी लक्षात घेता, तुमच्याविरुद्ध औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० च्या तरतुदी आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमानुसार कारवाई का केली जाऊ नये." असा इशारा डीसीजीआयने ई-फार्मसींना नोटीसममधून दिला आहे. २ दिवसांच्या आत संबंधित कंपनीने नोटीसला उत्तर न दिल्यास त्यांचे या प्रकरणी काहीही म्हणणे नसल्याचे गृहीत धरले जाईल आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
डीसीजीआयने डॉ. जहीर अहमद विरुद्ध केंद्र सरकार प्रकरणी दिलेल्या आदेशाचा संदर्भ दिला आहे. ई-फार्मसींना परवान्याशिवाय औषधांची ऑनलाइन विक्री करण्यास मनाई करण्यात आली. डीजीसीआयने पुढे म्हटले आहे की दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या निर्देशानंतरही ई-फार्मसी कोणत्याही परवान्याशिवाय ऑनलाइन औषधे विक्री करताना आढळून आल्या आहेत.
हे ही वाचा :