

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मधुमेह (डायबेटिस), क्षयरोग (टी.बी.), एचआयव्ही यासह अन्य आजारांवर प्रभावी ठरणारी एकूण 34 अत्यावश्यक औषधे स्वस्त होणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली. आता अत्यावश्यक औषधे स्वस्त होणार असल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र, कोरोना प्रतिबंधक औषधांचा समावेश या यादीत करण्यात आलेला नाही. अत्यावश्यक औषधांच्या यादीत एकूण 384 औषधांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मधुमेहविरोधी औषध इन्सुलिन ग्लेर्जिन, अँटी-टी.बी. ड्रग डेलामॅनिड, आयव्हरमेक्टिन आणि अँटिपॅरासाईट या औषधांचा समावेश आहे. यादीत समावेश केलेली 34 औषधे अत्यावश्यक मानली जातात. या यादीमध्ये सूचीबद्ध असलेली औषधे नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग अॅथॉरिटीने ठरवलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये विकली जातात. अत्यावश्यक औषधांची पहिली यादी 1996 मध्ये तयार करण्यात आली होती. यापूर्वी 2003, 2011 आणि 2015 मध्ये त्यात बदल करण्यात आले होते. आता ही यादी सप्टेंबर 2022 मध्ये पाचव्यांदा बदलण्यात आली आहे.
सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी आवश्यक असणार्या औषधांबरोबरच आयव्हरमेक्टिनचाही या यादीमध्ये समावेश आहे. हे औषध कीटक मारण्यासाठी उपयोगी असून, ते कोरोना काळात प्रभावी ठरले होते. या यादीमध्ये समावेश नसलेल्या औषधांच्या कंपन्या दरवर्षी आपल्या उत्पादनांच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. अंदाजे 1.6 लाख कोटी रुपयांच्या देशांतर्गत औषधनिर्मिती बाजारात शेड्युल्ड औषधांचा वाटा अंदाजे 17-18 टक्के असून, सुमारे 376 औषधांच्या किमती नियंत्रणात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, ठरवून दिलेल्या किंमत मर्यादेचे उल्लंघन केले, तर संबंधित कंपन्यांवर सरकारकडून कठोर कारवाई केली जाते. सामान्य लोकांना परवडणार्या किमतीत पुरेशा प्रमाणात मिळणार्या औषधांची यादी तयार करण्यास स्थायी समितीला सांगण्यात आले होते. यंदा विविध औषधांच्या किमती वेगळ्या पद्धतीने ठरवण्यात आल्या आहेत.