संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून, सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांकडून अदानींचा मुद्दा उपस्थित | पुढारी

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून, सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांकडून अदानींचा मुद्दा उपस्थित

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास मंगळवारपासून सुरुवात होणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सेंट्रल हाॅलमधील अभिभाषणाद्वारे अधिवेशनाची सुरुवात होईल. राष्ट्रपतींचे अभिभाषण झाल्यानंतर सरकारकडून आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी अदानी उद्योग समुहाचा मुद्दा उपस्थित करीत या विषयावर उभय सदनात चर्चा घडवून आणण्याची मागणी केली.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आता केवळ दीड वर्षांचा कालावधी बाकी राहिलेला आहे. त्यामुळे सरकारकडून सादर केला जाणारा यावेळचा अर्थसंकल्प हा शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प राहणार आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 एप्रिलपर्यंत चालणार असून 66 दिवसांत 27 बैठका होणार आहेत. अधिवेशनाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 13 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत दुसरा टप्पा चालेल.

सहकार्याचे विरोधकांना आवाहन

दरम्यान, अधिवेशन सुरळीतपणे चालण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारकडून विरोधी पक्षांना सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. मागास समाजाच्या कल्याणासाठी जातीआधारित आर्थिक सर्वेक्षण केले जावे, अशी मागणी वायएसआर काॅंग्रेसकडून बैठकीत करण्यात आली. देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये मागास समाजाची संख्या 50 टक्क्यांच्या वर आहे, पण बहुतांश लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. अशा स्थितीत या समाजाच्या कल्याणासाठी व्यापकपणे काम करणे गरजेचे आहे, असे वायएसआर काॅंग्रेसचे नेते विजयसाई रेड्डी यांनी सांगितले.

अदानी उद्योगसमुहावरुन सध्या देशात मोठी राळ उडालेली आहे. अदानी उद्योगसमुहाच्या कारभाराचा विषय संसदेत चर्चेला घेण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे संजय सिंग, राजदचे मनोज झा यांच्यासह द्रमुक आणि डाव्या पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत केली.

सर्वपक्षीय बैठकीकडे काॅंग्रेसची पाठ

काॅंग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप असल्यामुळे पक्षाचे बहुतांश नेते काश्मीरमध्ये होते. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. बैठकीस संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, अर्जुनराम मेघवाल, व्ही. मुरलीधरन, द्रमुक नेते टी. आर. बालू, तृणमूलचे सुदीप बंडोपाध्याय, सुखेंदू राॅय, बीआरएसचे के. केशव राव, नमा नागेश्वर राव, नॅशनल काॅन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, संयुक्त जदचे रामनाथ ठाकूर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी आदी नेते उपस्थित होते.

Back to top button