Hindu Marriage Act मधील कलम ११ अंतर्गत अल्‍पवयीन वधूचा विवाह रद्द ठरवता येत नाही : कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाचे निरीक्षण | पुढारी

Hindu Marriage Act मधील कलम ११ अंतर्गत अल्‍पवयीन वधूचा विवाह रद्द ठरवता येत नाही : कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाचे निरीक्षण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हिंदू विवाह कायद्यातील ( Hindu Marriage Act ) कलम ११ मध्‍ये वधूचे वय १८ वर्ष असावे अशी अट नाही, त्‍यामुळे या कलमान्‍वये अल्‍पवयीन वधूचा विवाह रद्द केला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाने नुकतेच नोंदवले. हिंदू विवाह कायद्यातील कलम ५ मधील कलम (iii) मध्‍ये विवाहावेळी वधूचे वय १८ असणे आवश्‍यक असल्‍याचे नमूद केले आहे. त्‍यामुळे अशा स्‍वरुपाचा विवाह कलम ११ अंतर्गत रद्द ठरवता येणार नाही, असेही खंडपीठाने स्‍पष्‍ट केले आहे.

Hindu Marriage Act : काय होते प्रकरण ?

१५ जून २०१२ रोजी मंजुनाथ यांचा विवाह चेन्‍नापटणा तालुक्‍यातील शीला हिच्‍याशी झाला. विवाहानंतर मंजुनाथ यांना माहिती मिळाली की, शीलाची जन्‍मतारीख ६ सप्‍टेंबर १९९५ अशी आहे. विवाहावेळी ती अल्‍पवयीन होती. त्‍यामुळे त्‍यांनी हा विवाह रद्द करण्‍यात यावा, अशी मागणी करणारी याचिका कौटुंबिक न्‍यायालयात दाखल केली. विवाहावेळी वधूचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्‍याचे स्‍पष्‍ट करत ८ जानेवारी २०१५ रोजी हिंदू विवाह कायद्यांतील कलम ११ अंतर्गत कौटुंबिक न्‍यायालयाने हा विवाह रद्द ठरवला होता.

कौटुंबिक न्‍यायालयाच्या निकालास उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान

२०१५ मध्‍ये शीला यांनी या प्रकरणी कर्नाटक उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती. त्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेवर
न्‍यायमूर्ती आलोक आराधे आणि न्‍यायमूर्ती एस. विश्‍वजीत शेट्टी यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

हिंदू विवाह कायद्यातील कलम ११ हे अवैध विवाहांशी संबंधित : उच्‍च न्‍यायालय

१२ जानेवारी २०२३ रोजी शीला यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवर निकाल देताना न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले की, ” हिंदू विवाह कायद्यातील कलम ११ हे अवैध किंवा बेकायदेशीर विवाहांशी संबंधित आहे. त्‍यामुळे या कलमान्‍वये अवैध विवाह हा रद्द ठरवता येतो. तसेच हिंदू विवाह कायद्यातील कलम (i), (iv) तरतुदींचे उल्‍लंघन होत असेल तर विवाह रद्द ठरवता येतो. या कायद्‍यातील कलम ५ मधील कलम (iii) मध्‍ये विवाहाच्‍या यावेळी वधूचे वय १८ असणे आवश्‍यक आहे, असे स्‍पष्‍ट केले आहे. मात्र ही अट कायद्याच्या कलम ११ च्या कक्षेतून वगळण्यात आली आहे. त्‍यामुळे कौटुंबिक न्‍यायालयाने या कलमा अंतर्गत रद्द ठरवलेला अल्‍पवयीन वधूचा विवाह रद्द ठरवता येत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.”

हेही वाचा : 

 

 

Back to top button