नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने बनविलेला वादग्रस्त लघुपट जामिया विद्यापीठात दाखविण्याचा प्रयत्न स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाकडून बुधवारी (दि.२५) करण्यात आला. मात्र याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांना ताब्यात घेतले.
लघुपटाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यात आली असल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून होत आहे. मात्र असे असले तरी डाव्या संघटनांकडून लघुपटाचे समर्थन करत ते दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जामिया विद्यापीठात सायंकाळी सहा वाजता हा लघुपट दाखविणार असल्याची घोषणा एसएफआयने केली होती. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी चार आयोजकांना ताब्यात घेतले.
हाच लघुपट दाखविण्याचा प्रयत्न याआधी जेएनयू विद्यापीठात मंगळवारी (दि.२४) रात्री झाला होता. जेएनयू स्टुडंटस युनियनने लघुपट दाखविला जाईल, असे पोस्टर्स सर्वत्र लावले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने लघुपट दाखविण्यास मनाई केली होती. तथापि रात्री लघुपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी दोन गटांमध्ये हाणामारीची परिस्थिती उद्भवली, दरम्यान विद्यापीठातील वीजदेखील कापण्यात आली होती.