नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील अबकारी कर घोटाळा प्रकरणी आतापर्यंत ७६ कोटी ५४ लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली असल्याची माहिती सक्तवसुली संचलनालयाकडून मंगळवारी देण्यात आली. दिल्ली आणि मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीतील घरे, रेस्टॉरंटस, ५० गाड्या तसेच बॅकांमधील ठेवी यांचा जप्त संपत्तीमध्ये समावेश आहे.
आम आदमी पक्षाचे संपर्क विभागाचे प्रमुख विजय नायर, मद्य व्यावसायिक समीर महेंद्रू, त्याची पत्नी आणि त्यांचा इंडोसिपरिट ग्रुप, व्यापारी दिनेश अरोरा, अरुण पिल्ले, बडी रिटेल प्रा. लि. नावाच्या मद्य कंपनीचा संचालक अमित अरोरा यांची विविध प्रकारची संपत्ती ईडीने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये जप्त केली.
बहुचर्चित अबकारी कर घोटाळा प्रकरणात सीबीआय तसेच ईडीने ज्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत, त्यात प्रमुख आरोपी म्हणून उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे नाव अग्रक्रमाने घेण्यात आलेले आहे. सिसोदिया यांनी बहुतांश पुरावे नष्ट केले असल्याचा दावा काही महिन्यांपूर्वी सीबीआयकडून करण्यात आला होता. अबकारी कर घोटाळाप्रकरणी ईडीने आतापर्यंत सहा जणांना अटक केलेली आहे.