प्रजासत्ताक दिनी पथसंचलनात पहिल्यांदाच अग्निवीरांचा सहभाग ; स्वदेशी ‘१०५ एमएम इंडियन फिल्ड गन्स’ने सलामी | पुढारी

प्रजासत्ताक दिनी पथसंचलनात पहिल्यांदाच अग्निवीरांचा सहभाग ; स्वदेशी '१०५ एमएम इंडियन फिल्ड गन्स'ने सलामी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देश यंदा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंत होणा-या पथसंचलनात अनेक चित्ररथ तसेच चित्तथरारक कवायतीं यंदा देशवासीयांना बघायला मिळणार आहेत. लष्कराकडून पथसंचलनात प्रदर्शित केली जाणारी सर्व हत्यारे ‘मेड इन इंडिया’ असतील.

प्रजासत्ताक दिनी देण्यात येणारी २१ तोफांची सलामी देखील स्वदेशी बनावटीच्या ‘१०५एमएम इंडियन फिल्ड गन्स’ने दिली जाणार आहे. गतवर्षीच्या स्वातंत्र दिनी या तोफांचा वापर करण्यात आला होता. पंरतु, यंदा पहिल्यांदाचा प्रजासत्ताक दिनी या तोफांचा वापर करण्यात येईल. इंडियन फिल्ड गन्स ब्रिटिशकालीन ‘२५-पाउंडर’ तोफांची जागा घेतील. या ब्रिटिश तोफांचा वापर दुसऱ्या महायुद्धात करण्यात आला होता.

इजिप्तच्या लष्कराची एक तुकडी तसेच भारतीय लष्करात नव्याने सामील झालेले अग्निवीर पहिल्यांदाच पथसंचलनात सहभागी होतील. यासोबतच पाकिस्तान लगतच्या वाळवंटी भागात सीमासुरक्षेत तैनात महिला सैनिकांची ‘बीएसएस उंट तुकडी’ देखील सहभागी होईल. ‘नारी शक्ती’चे प्रदर्शन करणाऱ्या नौसेच्या १४४ नाविकांच्या दलाचे नेतृत्व महिला अधिकारी करणार आहेत.

शिवाय, नौदलाचे आयएल-३८ हे विमान पथसंचलात शेवटची उड्डाण घेत घेणार असून इतिहास जमा होईल. या विमानाने जवळपास ४ दशकांहून अधिक काळ नौदलात सेवा दिली आहे. सकाळी साडे दहा वाजता विजय चौकातून पथसंचलनास सुरूवात होईल. लाल किल्ल्यापर्यंत पथसंचलनातील तुकड्या मार्च करतील. कोरोना महारोगराईमुळे लाल किल्ल्यापर्यंतचा पथसंचलनाचा पारंपारिक मार्ग बंद करण्यात आला होता. हवाई कसरतीमध्ये सहभागी होणाऱ्या ४४ विमानांमध्ये ९ राफेल जेट तसेच कमी वजनी युद्ध हेलीकॅप्टरसह इतर विमाने चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवतील. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचा चित्ररथ पहिल्यांदाच पथसंचलनात यंदा सहभागी होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button