पुढारी ऑनलाईन डेस्क : मोदी सरकारने २०१६ मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये (Surgical Strikes) किती जण ठार झाले याचा कसलाच पुरावा दिला नाही, असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला. सोमवारी (दि. २३) जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये ते बोलत होते.
दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राईकसह २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. सिंह यांनी, पुलवामा हल्ल्याच्या वेळी सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी सैनिकांना विमानाने सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे असे सांगितले होते, परंतु पंतप्रधानांनी ते मान्य केले नाही. परिणामी त्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआयपीएफ जवान शहीद झाले, असा दावा केला.
जम्मू-काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान दिग्विजय सिंह म्हणाले की, केंद्राने अद्याप संसदेत पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकचा अहवाल दिलेला नाही. भाजप सरकार केवळ खोटी माहिती पसरवत आहे. पुलवामामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या संचालकांनी हा संवेदनशील क्षेत्र असल्याची मागणी केली होती. सैनिकांना विमानाने श्रीनगरला पाठवले पाहिजे, पण मोदीजींनी नकार दिला. सरकारने हे जाणूनबुजून केले. तेथे प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते, मग स्कॉर्पिओ वाहन का तपासले नाही, त्यामुळे स्फोट झाला.
काँग्रेस नेते म्हणाले, कलम ३७० रद्द केल्याचा फायदा कोणाला झाला? दहशतवाद संपेल, हिंदूंचे वर्चस्व राहील, असे म्हणायचे, पण कलम ३७० हटवल्यापासून दहशतवाद वाढला आहे. रोज काही ना काही घडत असते. पूर्वी हा दहशतवाद या खोऱ्यापुरताच मर्यादित होता, मात्र आता तो राजौरी, डोडापर्यंत पोहोचला आहे.