गोवा : सरकारी खर्चातून परदेशवारीत बाबू आजगावकर अव्वल; मंत्रिपदाच्या काळात दिली पाच देशांना भेट | पुढारी

गोवा : सरकारी खर्चातून परदेशवारीत बाबू आजगावकर अव्वल; मंत्रिपदाच्या काळात दिली पाच देशांना भेट

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या पाच वर्षांत माजी पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी सरकारी खर्चातून सर्वाधिक परदेश वार्‍या केल्या आहेत. अधिकृत सरकारी कामासाठी त्यांनी 10 ऑगस्ट 2017 ते 3 मे 2019 दरम्यान विविध देशांत प्रवास केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिवाळी अधिवेशनातील अतारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. याबाबत हळदोणेचे आमदार कार्लोस फेरेरा यांनी प्रश्न विचारला होता.

उत्तरात म्हटले आहे की, बाबू आजगावकर यांनी पॅरिस (फ्रान्स), माद्रिद (स्पेन), शिकागो, न्यूयॉर्क (अमेरिका), दुबई (यूएई) आणि चीनला भेटी दिल्या आहेत. या भेटींवर एकूण 24 लाख 57 हजार 528 रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याखालोखाल मंत्री गोविंद गावडे यांनी अमेरिकेतील तीन ठिकाणी भेटी दिल्या आहेत. यामध्ये लॉस अँजेलिस, सॅन फ्रॅन्सिस्को आणि हवाई यांचा समावेश आहे. या भेटींचा खर्च 9 लाख 45 हजार 11 रुपये इतका होता. याशिवाय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री सुदिन ढवळीकर

आणि माजी मंत्री विनोद पालयेकर यांनी प्रत्येकी एका देशाला भेट दिली आहे. पालयेकर यांनी अमेरिका, ढवळीकरांनी पोर्तुगाल तर मुख्यमंत्र्यांनी रशियाला भेट दिली होती. पालयेकर यांच्या भेटीचा खर्च 9 लाख 35 हजार 830 रुपये इतका होता. तर ढवळीकरांच्या भेटीचा खर्च 5 लाख 18 हजार 251 रुपये झाला.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सर्वाधिक खर्च

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 10 ते 13 ऑगस्ट 2019 दरम्यान रशियाला सरकारी कामासाठी भेट दिली होती. या भेटीसाठी सर्वाधिक 51 लाख 19 हजार 171 रुपये खर्च झाल्याची माहिती सामान्य प्रशासकीय विभागाने दिली आहे.

Back to top button