म्हापशात बारमध्ये स्फोट; परिसर हादरला; घातपाताचा संशय | पुढारी

म्हापशात बारमध्ये स्फोट; परिसर हादरला; घातपाताचा संशय

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : डांगी कॉलनी, म्हापसा येथील हिल टॉप बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटमध्ये मोठा स्फोट झाला. यात बारसह सात फ्लॅट, दोन दुकाने, समोरचा एक बंगला, तीन घरे, रस्त्यावर पार्क करून ठेवलेली तीन चारचाकी वाहने, दोन दुचाकींचे नुकसान झाले. ही घटना रविवारी, 22 रोजी पहाटे 5:30 वाजता घडली.

हा स्फोट सिलिंडरचा नसल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले असून, तो बॉम्बस्फोटही नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे हा स्फोट नेमका कशाचा, याचे उत्तर रात्री उशिरापर्यंत मिळालेले नव्हते. दरम्यान, बार मालक प्रमिला मयेकर यांनी हा घातपाताचा प्रकार असून, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पहाटेच्या वेळेस मोठा आवाज झाल्याने येथील लोकांना बॉम्बस्फोट झाल्याचा भास झाला. बंद असलेल्या हिल टॉप बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटमध्ये मोठा स्फोट होऊन हॉटेलचे शटर तुटून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला जाऊन पडले. खिडक्यांची ग्रील्स व तावदाने तुटून लांब जाऊन पडली. स्फोटाची भीषणता इतकी होती की, बारमधील सामान जळून बाहेर पडले. त्यामुळे बाहेर असलेल्या स्कूटरला आग लागली. या स्फोटामुळे या बिल्डिंगमधील काही फ्लॅटच्या भिंतींना तडे गेले, तर अनेक फ्लॅटच्या खिडक्यांची काचेची तावदाने फुटली. या स्फोटात इमारतीतील एकूण सात फ्लॅट, दोन दुकाने, समोरचा एक बंगला, तीन घरे रस्त्यावर पार्क करून ठेवलेल्या तीन चार चाकी वाहने, व दोन दुचाकी वाहनांचे नुकसान झाले.

म्हापसा अग्निशमन दलास याची माहिती मिळाल्यानंतर दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बारमधील सिलिंडर बाहेर काढत आगीवर नियंत्रण आणले. सिलिंडर लिकेज होऊन आतमध्ये व्हॅक्युम तयार झाल्याने स्फोट झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, सिलिंडरचा स्फोट झाला नसल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.

स्फोटाची माहिती मिळताच आमदार ज्योशुआ डिसोझा, उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, डॉ. नूतन डिचोलकर, नगरसेवक तारक आरोलकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत गुन्हा नोंद केलेला असून, पोलिसांना याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश आपण दिल्याचे आमदार डिसोझा यांनी सांगितले.

बॉम्बस्फोटही नाही…

बारमध्ये बॉम्बस्फोट झालेला नाही, असा प्राथमिक अंदाज आहे. संपूर्ण परिसराची बॉम्ब शोध पथकाने तपासणी केली आहे. त्यात काहीही संशयास्पद आढळलेले नाही. बारमधील फ्रिजला स्टॅबिलायझर्स नाहीत आणि बारच्या मागच्या बाजूने व्हेंटिलेशन नसल्याने आतील दाब समोरील शटरच्या बाजूने पडला असावा. या बारचा परवाना रात्री 11 पर्यंत असतानाही बार पहाटे 4:30 पर्यंत सुरू होता, असे बाजूच्या सीसीटीव्ही फुटेजवरून आढळून आले आह. याबद्दल अबकारी खात्याला कळवण्यात येणार असून या बारचा परवाना रद्द करण्यास कळवले जाईल. हा स्फोट कसा झाला याचा तपास वीज खाते व अग्निशामक दल करणार आहेत, अशी माहिती उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिली.

बॉम्ब शोध पथक दाखल

बारमधील दोन्ही सिलिंडर सुरक्षित असल्याने हा स्फोट नेमका कशाचा, याचा तपास सुरू आहे. त्यासाठी सायंकाळी उशिरा पोलिसांनी बॉम्ब शोध पथकास पाचारण केले. त्यांच्यासोबत उपाधीक्षक जीवबा दळवी व पोलिस निरीक्षक सोमनाथ माझी उपस्थित होते.

Back to top button