पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'पठाण' (Pathaan Row) चित्रपटावरून वाद सुरूच आहे. याचे पडसाद आसाममध्ये उमटले. गुवाहाटीमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत पोस्टर जाळले. या घटनेनंतर शाहरुख खानने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्व शर्मा यांना शनिवारी मध्यरात्री २ वाजता फोन करून घडलेल्या घटनेवर चिंता व्यक्त केली.
याबाबत मुख्यमंत्री शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "शाहरुख खान यांचा मध्यरात्री दोन वाजता फोन आला. चित्रपटाच्या (Pathaan Row) प्रदर्शनादरम्यान गुवाहाटीमध्ये घडलेल्या घटनेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मी त्यांना आश्वासन दिले की, कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. आम्ही चौकशी करू आणि असा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेऊ. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाई करून गुन्हाही दाखल केला जाईल."
दरम्यान, पठाण चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'बेशरम रंग' हे गाणे रिलीज झाल्यानंतर चित्रपटाविरोधात निदर्शने सुरू झाली. त्याचवेळी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
जेव्हा पठाण चित्रपटाशी संबंधित सर्व वादांवर मुख्यमंत्री शर्मा यांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती, तेव्हा ते म्हणाले होते की, ते अभिनेता शाहरुख खान याला ओळखत नाहीत. 'कोण शाहरुख खान? मला त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही आणि मला 'पठाण' या चित्रपटाबद्दल काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना दिली होती.
आसामसह देशातील विविध राज्यांमध्ये हिंदू संघटना या चित्रपटाला विरोध करत आहेत. गुवाहाटीमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत पोस्टर जाळले.
हेही वाचलंत का ?