Swiggy ने ३८० कर्मचाऱ्यांना दिला नारळ, जाणून घ्या नोकरकपातीचे कारण?

Swiggy ने ३८० कर्मचाऱ्यांना दिला नारळ, जाणून घ्या नोकरकपातीचे कारण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्गज टेक कंपन्यांसोबत आता फूड डिलिव्हरी आणि अन्य स्टार्टअप्स कंपन्यांनीदेखील नोकरकपात सुरू केली आहे. फूडटेक कंपनी स्विगीने (Swiggy lays off) ३८० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. व्हेंचर फंडिंग मार्केटच्या अडचणी लक्षात घेऊन नोकरकपातीचे हे पाऊल उचलले असल्याचे स्विगीच्या प्रवक्त्याकडून आज (दि. २०) सांगण्यात आले आहे. या निर्णयाची माहिती कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, ट्विटर आणि ॲमेझॉनकडून नोकरकपात सुरु आहे. आता आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर स्टार्टअप्स कंपन्यादेखील नोकरकपात करत आहेत.

"आम्ही पुनर्रचनेचा एक भाग म्हणून एक कठीण निर्णय घेत टीममधील मनुष्यबळ कमी करत आहोत. या प्रक्रियेत आम्ही ३८० स्विगस्टर्सना निरोप देणार आहोत. सर्व उपलब्ध पर्याय शोधल्यानंतर घेतलेला हा अत्यंत कठीण निर्णय आहे आणि या प्रक्रियेतून तुम्हाला जावे लागल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत," असे स्विगीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मॅजेती (Swiggy founder and CEO Sriharsha Majety) यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे. "टीमने चांगली कामगिरी केली आहे. ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही इन्स्टामार्टद्वारे मीट डिलिव्हरी देणे सुरू ठेवू. आम्ही इतर नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक करत राहू.," असेही पुढे त्यांनी नमूद केले आहे.

ज्या कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात आले आहे त्यांना त्यांचा कार्यकाळ आणि ग्रेडनुसार तीन ते सहा महिन्यांचा पगार दिला जाणार आहे. यामध्ये व्हेरिएबल पे/ इन्सेन्टिव्हच्या १०० टक्के पेआउटचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

नुकतेच ShareChat ची पेरेंट कंपनी मोहल्ला टेक प्रायव्हेटने २,१०० कर्मचाऱ्यांपैकी ६०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. या निर्णयानंतर लगेच एका आठवड्याच्या आत Swiggy ने ३८० कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. (Swiggy lays off)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news