

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) हंसराज कॉलेजच्या (Hansraj College) वसतिगृह आणि कॅन्टीनमध्ये मांसाहार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मांसाहार बंद केल्याने सर्वात जास्त त्रास परदेशी विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. तसेच जे विद्यार्थी येथे राहण्यास आहेत, त्यांनाही याचा त्रास होत आहे. यासोबतच ईशान्येकडील किंवा दक्षिणेकडील राज्यांमध्ये राहणारे विद्यार्थीही या निर्णयामुळे चिंतेत आहेत.
विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पहिल्या लॉकडाऊननंतर पुन्हा ऑफलाइन वर्ग सुरू झाले. आणि मार्चपासून वसतिगृहे सुरू झाल्यावर मांसाहार बंद करण्यात आला. यंदाच्या प्रवेशासाठी जारी केलेल्या माहितीपत्रकात महाविद्यालयाच्या (Hansraj College) वसतिगृहात आणि कँटीनमध्ये फक्त शाकाहारी जेवणच मिळेल, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
मुलांच्या वसतिगृहात १८३ मुले आणि मुलींच्या वसतिगृहात १२ मुली आहेत. मांसाहारावर बंदी आल्यापासून विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे अनेकवेळा मांसाहार सुरू करण्याची मागणी केली आहे. परंतु, ज्यांना मांसाहार हवा आहे. त्यांनी बाहेर जाऊन जेवण करावे किंवा वसतिगृह सोडून इतरत्र राहावे, असे महाविद्यालय प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
हेही वाचा :